एअर इंडिया प्रकरणानंतर रवींद्र गायकवाड यांना ओळखणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी गेल्यानंतर त्यांना सेल्फीची विनंती होते. जर कुणी सेल्फी मागितली तर त्याला नाही कसे म्हणावे म्हणून सुरुवातीला ते सेल्फीला परवानगी देत असत परंतु त्यामध्ये त्यांचा वेळ जाऊ लागला. त्यामुळे त्यांना एक शक्कल लढवली आहे. आपल्या सारख्याच दिसणाऱ्या व्यक्तीला ते नेहमी सोबत घेऊन जातात.  सार्वजनिक ठिकाणी जाताना गायकवाड हे टी-शर्टमध्ये जातात आणि त्यांच्यासारखी हुबेहुब दिसणारी व्यक्ती कुर्ता पायजमामध्ये असते. कुणालाही त्यांच्या पेहरावामुळे ते कुणालाही रवींद्र गायकवाडच वाटतात. त्यांना लोक सेल्फीची मागणी करतात तेव्हा ते सेल्फीची परवानगी देतातही.  त्यांच्यासारखे दिसणाऱ्या या व्यक्तीचे नाव रमाकांत सागर आहे असे मुंबई मिररने म्हटले आहे.

सागर हे गेल्या कित्येक वर्षांपासून गायकवाड यांच्यासोबत काम करतात. ते शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत. गायकवाड यांच्यावरील विमानप्रवासाची बंदी मागे घेतली तरी ते अजूनही रेल्वेनी प्रवास करत आहे. याचे कारण विचारले असता ते म्हणाले राजधानी एक्सप्रेसचा प्रवास जास्त आरामदायक वाटतो. काही दिवसांपूर्वी रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करताना एका कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. त्यानंतर एअर इंडियासह सर्वच विमान कंपन्यांनी रवींद्र गायकवाड यांच्यावर बंदी घातली होती. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाच्या हस्तक्षेपानंतर एअर इंडियाने ही बंदी मागे घेतली होती.

खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर एअर इंडियासह इतर विमान कंपन्यांनी घातलेल्या प्रवासबंदीवरून शिवसेना आक्रमक झाली होती. रवींद्र गायकवाड यांच्यावरील बंदी उठवली नाही तर मुंबईतून एकही विमान उडू देणार नाही, असा इशारा देणाऱ्या शिवसेनेने आता सरकारलाच थेट इशारा दिला होता. येत्या १० एप्रिलपर्यंत या मुद्द्यावर तोडगा काढला नाही तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) च्या बैठकीवर बहिष्कार टाकू, असा इशारा शिवसेनेने दिला होता. शिवसेनेच्या नेत्यांना चुकीच्या पद्धतीने ‘टार्गेट’ केले जात आहे, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता. रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला झालेल्या मारहाणीवर दिलगिरी व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांच्यावरील बंदी उठवण्यात आली.