शिवसेना नेते रवींद्र वायकर यांची मुख्यमंत्री कार्यालयात मुख्य समन्वयक अधिकारी (चीफ ऑपरेटिंग ऑफिसर) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत शुक्रवारी आदेश जारी केले.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून काम पाहिलेल्या आणि उद्धव ठाकरे यांच्या विश्वासातील वायकर यांचा महाआघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात समावेश झाला नव्हता. पंतप्रधान कार्यालयाच्या धर्तीवर मुख्यमंत्री कार्यालयात एका मंत्र्याची नियुक्ती करण्याच्या प्रस्तावावर ठाकरे यांचा विचार सुरू  होता. कायदेशीर बाबींचीही तपासणी करण्यात आली. अनिल परब, मिलिंद नार्वेकर यांच्या नावांचीही चर्चा सुरू होती. पण वायकर यांच्या नावावर ठाकरे यांनी शिक्कामोर्तब केले.

मुख्यमंत्री व पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोपविलेल्या नवीन जबाबदारीमुळे आपण आनंदी व समाधानी असून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहू, असे वायकर यांनी सांगितले.