रिझव्‍‌र्ह बँकेकडून प्रक्रिया सुरू

दृष्टिहीनांना विविध मूल्यांच्या नव्या नोटा आणि नाणी ओळखण्यास मदत करू शकेल असे ‘मोबाइल अ‍ॅप’ विकसित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) शुक्रवारी उच्च न्यायालयात दिली.

दृष्टिहीनांना विविध मूल्यांच्या नव्या नोटा आणि नाणी स्पर्शाने ओळखण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे दृष्टीहीनांना या नोटा आणि नाणी ओळखता यावीत यासाठी त्याच्या स्वरूपात त्यानुसार बदल करण्याचे आदेश रिझव्‍‌र्ह बँकेला द्यावेत, अशी मागणी ‘नॅशनल असोसिएशन ऑफ द ब्लाइंड’ (नॅब) या संस्थेने जनहित याचिकेद्वारे केली आहे. त्याची दखल घेत दृष्टिहीनांना विविध मूल्यांच्या नव्या नोटा आणि नाणी ओळखण्यास मदत करू शकेल असे ‘मोबाइल अ‍ॅप’ विकसित करण्याबाबत विचार करा, अशी सूचना न्यायालयाने मागील सुनावणीच्या वेळी रिझव्‍‌र्ह बँकेला केली होती.

शुक्रवारी याप्रकरणी झालेल्या सुनावणीत दृष्टिहीनांना विविध मूल्यांच्या नव्या नोटा आणि नाणी ओळखण्यास मदत करू शकेल असे ‘मोबाइल अ‍ॅप’ विकसित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी चार तज्ज्ञांची एक समिती गेल्याच महिन्यात स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती रिझव्‍‌र्ह बँकेच्या वतीने ज्येष्ठ वकील श्याम मेहता यांनी न्यायालयाला दिली. शिवाय १०० आणि त्यावरील मूल्यांच्या नोटांचे स्वरूप हे असे आहे की त्या नोटांचे मूल्य स्पर्शाने दृष्टिहीनांना सहजपणे ओळखता येईल, असेही रिझव्‍‌र्ह बँकेतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले. सततच्या वापरामुळे नोटांवरील चिन्ह हे बऱ्याचदा धूसर होत जाते, परंतु नव्या अ‍ॅपमुळे दृष्टिहीनांना अशा नोटा वा चलनेही ओळखता येणार आहे. हे अ‍ॅप प्रत्येक मोबाइलवर विनाशुल्क उपलब्ध करण्यात येणार आहे, अशी माहितीही बँकेच्या वतीने मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठाला देण्यात आली.