पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरला ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या. त्यावेळी ३१ मार्चपर्यंत बँकांमधून नोटा बदलून न घेणाऱ्या नागरिकांना आरबीआयच्या कार्यालयांमध्ये आवश्यक कागदपत्रे सादर करून त्या जमा करता येणार आहे, असे मोदी यांनी सांगितले होते. मात्र, ३१ मार्चनंतर आरबीआयच्या कार्यालयांमध्ये जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी गेलेल्या नागरिकांच्या पदरी निराशा आली आहे. आरबीआयने त्यांच्याकडील जुन्या नोटा स्वीकारण्यास नकार दिला आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर ३० डिसेंबरपर्यंत परदेशात असणाऱ्या अनिवासी भारतीयांनाच जुन्या नोटा जमा करता येणार आहेत, असे उत्तर आरबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिले. आरबीआयच्या या धोरणावर नाराजी व्यक्त करत मुंबईत आरबीआयच्या कार्यालयात नोटा जमा करण्यासाठी आलेल्या नागरिकांनी निदर्शने केली.

नोटाबंदीनंतर जुन्या नोटा बँकांमध्ये जमा करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. या कालावधीत नोटा बँकांमध्ये जमा करू न शकणाऱ्या नागरिकांना आरबीआयच्या कार्यालयांमध्ये प्रतिज्ञापत्र सादर करून त्या जमा करता येणार आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केले होते. ३१ डिसेंबरला बँकांमध्ये नोटा जमा करण्याची मुदत संपली. त्यानंतर आपल्याकडील जुन्या नोटा जमा करण्यासाठी नागरिकांनी मुंबईसह कोलकाता, अहमदाबाद तसेच देशातील इतर ठिकाणी आरबीआयच्या कार्यालयांमध्ये धाव घेतली. मात्र, आरबीआयच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडील नोटा स्वीकारण्यास नकार दिला. आरबीआयच्या या भूमिकेने शेकडो नागरिकांच्या पदरी निराशा पडली. सरकारच्या सूचनेनुसार, नोटाबंदीच्या कालावधीत परदेशात असलेल्या अनिवासी भारतीयांनाच नोटा जमा करण्याची सवलत देण्यात आली आहे. इतर नागरिकांना ही मुभा देण्यात आली नाही, असे उत्तर आरबीआयच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आले. यामुळे अनेक नागरिकांनी आरबीआयच्या या धोरणाविरोधात नाराजी व्यक्त केली. तर मुंबईतील आरबीआयच्या कार्यालयाबाहेर नागरिकांनी निदर्शने केली.

आरबीआयच्या अधिकाऱ्यांनी जुन्या नोटा स्वीकारण्यास नकार दिल्याने अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. (छायाचित्रः संतोष परब)
आरबीआयच्या अधिकाऱ्यांनी जुन्या नोटा स्वीकारण्यास नकार दिल्याने अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. (छायाचित्रः संतोष परब)

सरकार, आरबीआयच्या वेळोवेळी बदललेल्या भूमिका!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरच्या रात्री नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयानंतर ३१ डिसेंबरपर्यंत नागरिकांना त्यांच्याकडील जुन्या नोटा बँकांमध्ये जमा करता येणार आहेत, असे त्यांनी सांगितले होते. मात्र, या कालावधीत जुन्या नोटा जमा करता न येणाऱ्या नागरिकांना प्रतिज्ञापज्ञ सादर करून त्या नोटा आरबीआयच्या विविध कार्यालयांमध्ये जमा करता येणार आहेत, असेही ते म्हणाले होते.

केंद्रीय अर्थमंत्रालयाने ८ नोव्हेंबरलाच याबाबत प्रसिद्धी पत्रक काढले होते. ३० डिसेंबरपर्यंत जुन्या नोटा बँकांमध्ये जमा करू न शकणारे नागरिक आवश्यक कागदपत्रांसह आरबीआयच्या कार्यालयांमध्ये त्या जमा करू शकतील, असे त्या पत्रकात म्हटले होते.

नोटाबंदीनंतर ३० डिसेंबरपर्यंत परदेशात असलेल्या नागरिकांनाच आपल्याजवळील जुन्या नोटा आरबीआयच्या कार्यालयांमध्ये जमा करता येतील. त्यासाठी ठोस कारणही द्यावे लागेल.