शिवसेना आणि काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
शिवसेना आमदार कृष्णा घोडा यांच्या निधनाने रिक्त असलेल्या पालघर (राखीव) मतदारसंघात १३ फेब्रुवारीला पोटनिवडणूक होणार असून, शिवसेना आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.
घोडा यांच्या निधनांनतर गेल्या जून महिन्यात पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता, पण न्यायालयात याचिका प्रलंबित असल्याने तेव्हा निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक लांबणीवर टाकली होती. शिवसेनेने कृष्णा घोडा यांच्या मुलाची उमेदवारी तेव्हा जाहीर केली होती.
घोडा यांच्या निधनानंतर बराच कालावधीने पोटनिवडणूक होत असल्याने सहानुभूतीचा कितपत परिणाम होईल, याबाबत शिवसेनेत साशंकता आहे. जून महिन्यात पोटनिवडणूक झाली असती तर शिवसेनेला त्याचा नक्कीच फायदा झाला असता.
ऑक्टोबर २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत घोडा यांनी काँग्रेस उमेदवार आणि माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित यांचा अवघ्या ५५० मतांनी पराभव केला होता. शिवसेना, काँग्रेस आणि हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये तिरंगी लढत अपेक्षित आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीत काँग्रेसच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यामुळेच या पोटनिवडणुकीचा फायदा घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असेल.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 13, 2016 4:09 am