शिक्षकांच्या नियुक्तीसाठी घेण्यात आलेल्या ‘टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट’ (टीईटी) म्हणजेच ‘शिक्षक पात्रता चाचणी’ परीक्षेची क्रमांक १ ही प्रश्नपत्रिका फुटल्याचे चौकशीत सिद्ध झाले असून आता ही परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहे.

१६ जानेवारीला ही परीक्षा झाली होती. प्राथमिक, उच्च प्राथमिक अशा वेगवेगळ्या स्तरांवर दिवसभर ही परीक्षा होणार होती. त्यापैकी क्रमांक १ची प्रश्नपत्रिका सकाळी ९च्या सुमारास व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून फिरू लागली. बीडमधील एका पत्रकाराच्या भ्रमणध्वनीवर ही १५० प्रश्नांची प्रश्नपत्रिका आल्यानंतर त्यांनी ही बाब शालेय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्रश्नपत्रिका फुटल्याचे निष्पन्न झाल्याने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शालेय शिक्षण सचिव नंदकुमार यांना ४८ तासांत या पेपरफुटीची चौकशी करण्याचे आदेश दिले. या चौकशीत क्रमांक १ची प्रश्नपत्रिका फुटल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच, प्रश्नपत्रिका क्रमांक १ची परीक्षा पुन्हा घेण्याची शिफारस सचिवांनी शिक्षणमंत्र्यांना सादर केलेल्या अहवालात केल्याचे सूत्रांकडून समजते.