दहावीत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून शिक्षण विभागाने जुलैमध्येच फेरपरीक्षा घेण्यास सुरुवात केली असली तरी प्रत्यक्षात फेरपरीक्षा देणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांचे अकरावीचे प्रवेश यंदा अजूनही झालेले नाहीत. सात फेऱ्यांनंतरही अद्याप मुंबई आणि उपनगरातील अकरावीची प्रवेश प्रक्रिया आटोपलेली नाही.

दहावीला अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा ऑक्टोबरऐवजी जुलैमध्ये घेण्याची घोषणा तत्कालीन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली. त्यानुसार राज्य मंडळाने परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करून परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये घेण्यास सुरुवात केली. विद्यार्थी जुलैमधील परीक्षेत उत्तीर्ण झाल्यास किंवा एटीकेटी मिळाल्यास त्याच वर्षी अकरावीला प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला होता, जेणेकरून विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही.

प्रत्यक्षात मात्र परीक्षा जुलैमध्ये झाली तरी विद्यार्थ्यांचे अकरावीचे प्रवेश प्रथम सत्र संपेपर्यंत होत नसल्याचे चित्र आहे. यंदाही मुंबई आणि उपनगरांमधील अकरावीची प्रवेश प्रक्रिया अद्यापही पूर्ण झालेली नाही. अकरावीच्या तीन नियमित फेऱ्या, त्यानंतर विशेष फेऱ्या, नंतर प्रथम येणाऱ्यास प्राधान्य फेऱ्या अशा जवळपास सात फेऱ्या झाल्यानंतरही अजून प्रवेशासाठी मुदतवाढ देण्याची गरज शिक्षण विभागाला वाटत आहे.

राज्यातील इतर भागांतील ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया यंदा लांबल्या असल्या तरी किमान आता पूर्ण झाल्या आहेत. मुंबईत मात्र अजूनही प्रवेश मिळू न शकलेले विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी आता १५ ते १७ ऑक्टोबपर्यंत शिक्षण विभागाने मुदत दिली आहे. ‘जुलै परीक्षेच्या निकालानंतर अकरावीला प्रवेश घेण्यासाठी पात्र ठरलेले विद्यार्थी प्रवेशासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे विचारणा करत असल्यामुळे या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली असल्याचे विभागाचे म्हणणे आहे.

सध्या महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या सत्र परीक्षा होत आहेत. निवडणुकांमुळे अनेक महाविद्यालयांनी काही विषयांच्या परीक्षा लवकर घेतल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रवेश होईपर्यंत अकरावीचे पहिले सत्र संपलेले असेल. त्यामुळे कागदोपत्री विद्यार्थ्यांचे वर्ष वाचणार असले तरी शैक्षणिक नुकसान मात्र टळणारे नसल्याचेच दिसत आहे.

दरम्यान, आतापर्यंतच्या फेऱ्यांनंतर मुंबई आणि उपनगरांतील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या साधारण १ लाख जागा रिक्त आहेत.

अकरावीला अद्यापही प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी १५ आणि १६ ऑक्टोबर सकाळी १०.३० वाजल्यापासून ते कार्यालयीन वेळ संपेपर्यंत आणि १७ ऑक्टोबर दुपारी १ वाजेपर्यंत चर्नी रोड येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयात विद्यार्थ्यांनी संपर्क साधायचा आहे. विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे बरोबर आणावीत, असे आवाहन शिक्षण उपसंचालक कार्यालयाने केले आहे.