उमाकांत देशपांडे

मेट्रो कारशेड आरेऐवजी गोरेगाव पहाडी भागात किंवा अन्यत्र नेल्यास प्रकल्पाची किंमत तर वाढेलच, पण प्रकल्प आराखडा बदलल्याने फेरनिविदाही काढाव्या लागण्याची शक्यता आहे.

नवीन कारशेडच्या मार्गजोडणीसाठीही अनेक झाडे कापावी लागतील. आरेच्या कारशेडसाठी शिवसेनेने विरोध केला, मात्र करोना काळात मुंबईत साडेतीन हजार झाडे कापण्यास महापालिकेच्या वृक्ष समितीने परवानगी दिली, असा आरोप भाजप आमदार अ‍ॅड. आशीष शेलार यांनी केला.

आरेमधील मेट्रो कारशेडसाठी झाडे कापली गेल्याने तीव्र विरोध झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पर्यायी जागेचा शोध घेण्याची सूचना शुक्रवारच्या बैठकीत केली असून पहाडी गोरेगाव किंवा अन्य जागेचा पर्याय निवडला जाण्याची शक्यता आहे. आरेतील जागेस शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसनेही विरोध केल्याने पुन्हा त्याच जागी कारशेड करण्यात राजकीय अडचण आहे. त्यामुळे पर्यायी जागेचा विचार करण्यात येत आहे.

पण त्यामुळे प्रकल्पाचे आरेखन बदलणार असून नवीन जागेपर्यंत मार्गजोडणीमुळे प्रकल्पाची किंमत तर वाढेलच, पण निविदाही नव्याने मागवाव्या लागतील, अन्यथा वाद न्यायालयात जाईल. त्यात वेळही जाणार आहे. आरेमधील जागेतील झाडे कापून सपाटीकरण करण्यात आले आहे. त्या जागेचे काय करणार, हा प्रश्नही निर्माण होणार आहे, असे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले.

भाजप आमदार शेलार यांनी कारशेडसाठी नवीन जागेच्या पर्यायावर टीका केली. खासगी जागेचा वापर करून मालकाला विकासहक्क हस्तांतरण (टीडीआर) द्वारे भरपाई दिली जाईल व अन्यही अनेक प्रश्न निर्माण होऊन प्रकल्प खर्च व वेळ वाढेल, असे मत व्यक्त केले. नवीन जागेसाठीही झाडे कापावी लागतील, मग ते कसे चालणार, असा सवालही त्यांनी केला.

* आरेमधील मेट्रो कारशेडसाठी झाडे कापली गेल्याने तीव्र विरोध झाला.

*  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पर्यायी जागेचा शोध घेण्याची सूचना केली  आहे.

* पहाडी गोरेगाव किंवा अन्य जागेचा पर्याय निवडला जाण्याची शक्यता आहे.