News Flash

एलबीटी रद्द करण्याचा निर्णय मुठभर लोकांसाठी…

अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जनतेचा अपेक्षाभंग झाल्याचे सांगत सरकारवर टीकेची झोड उठविली.

| March 18, 2015 04:52 am

भाजप-शिवसेना युती सरकारचा पहिला अर्थसंकल्प सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी दुपारी विधानसभेत सादर केला. हा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जनतेचा अपेक्षाभंग झाल्याचे सांगत सरकारवर टीकेची झोड उठविली.

एलबीटी रद्द करण्याचा निर्णय मुठभर लोकांसाठी…
सरकारचा हा अर्थसंकल्प पूर्णपणे निराशा करणारा ठरल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी सांगितले. या अर्थसंकल्पात करविषयक बाबींबिषयी पुरेशी स्पष्टता नसून यासंदर्भात बऱ्यात गोंधळात टाकणाऱ्या गोष्टी असल्याचे त्यांनी म्हटले. अर्थसंकल्पामध्ये जुन्या योजनांना नवे नाव देऊन सादर करण्यात आले आहे. तसेच राज्यात एलबीटी रद्द करण्याचा निर्णय करण्याचा निर्णय मुठभर लोकांसाठी घेतला गेला असून, त्यामुळे राज्यातील इतर जनतेवर कराचा बोजा पडणार असल्याचाही आरोप यावेळी तटकरे यांनी केला. याशिवाय, राज्याचा महसूल वाढविण्याच्यादृष्टीनेही अर्थसंकल्पात ठोस तरतूदी केल्या नसल्याचे तटकरेंनी सांगितले.

अर्थसंकल्पाबाबत बोलावे असे काहीच नाही.. ‘अवर्णनीय’ अर्थसंकल्प
राज्य सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत बोलायला असे काहीच उरलेले नाही. त्यामुळे एका अर्थाने या अर्थसंकल्पाला अवर्णनीय म्हणता येईल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते रत्नाकर महाजन यांनी दिली. राज्याचा घटलेला विकास दर आणि दरडोई उत्पन्नाबाबत अर्थमंत्र्यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे राज्याच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण असलेले अनेक विषय अनुत्तरीतच राहिले असल्याचे महाजन यांनी म्हटले. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केलेल्या या अर्थसंकल्पानूसार आगामी काळात कारभार चालणार असेल तर, आगामी काळात सरकार दिशाहीन असेल, असे मत रत्नाकर महाजन यांनी व्यक्त केले.

अर्थसंकल्पाने महाराष्ट्रातील जनतेच्या अपेक्षा फोल ठरविल्या…
महाराष्ट्रातील जनतेला राज्य सरकारच्या अर्थसंकल्पाकडून बऱ्याच आशा होत्या, सरकार आपल्याला न्याय देईल, असे त्यांना वाटत होते. मात्र, अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर या अपेक्षा फोल ठरल्या असल्याचे काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी सांगितले. या अर्थसंकल्पात गरिबांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या अन्नसुरक्षेच्याबाबतीत कोणतीही तरतूद नाही. अवकाळी पाऊस आणि गारपीटीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांना १०,००० कोटींच्या मदतीची घोषणा होणे अपेक्षित होते. मात्र, अर्थसंकल्पात तशी कोणतीही तरतूद नसल्याने अपेक्षाभंग झाल्याचे माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.

शेतक-यांचे मनोधैर्य वाढविणारा अर्थसंकल्प – तावडे
दुष्काळाच्या पाठोपाठ गारपीट व अवकाळी पाऊस अशा दुहेरी संकटात सापडलेल्या शेतक-यांच्या हिताला प्राधान्य देणारा आणि शेतक-यांना सावकारी पाशातून मुक्त करुन त्यांना नवीन उभारी देत बळीराजाला आर्थिक स्थैर्य देणारा, तसेच त्यांचे मनोधैर्य वाढविणारा हा अर्थसंकल्प आहे. बळीराजाच्या हिताच्या दृष्टीने पाणी, वीज, बि-बियाणे यामध्ये अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. राज्यामध्ये दर्जेदार व मूल्याधिष्ठीत शिक्षणासाठी तसेच विद्यार्थ्यांची परीक्षा व शिक्षकांचे मूल्यमापन यावर अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. गड–किल्ले यांचे संवर्धनासाठी तरतूद करतानाचा डिजिटल महाराष्ट्राची संकल्पना मांडून विकासाच्या दृष्टीने आणखी पाऊल टाकण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्यात नाटयगृह निर्मितीचा संकल्प करताना राज्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा पुढे चालविण्याच्या दृष्टीने वाटचाल करण्यात आली आहे. तरुणाई, शेतकरी, आदिवासी, महिला या सर्वच घटकांच्या हिताचा विचार अर्थसंकल्पात केला असल्याने महाराष्ट्राच्या विकासाला नक्कीच नवी दिशा प्राप्त होईल आणि महाराष्ट्र प्रगतीपथावर जाईल, असा विश्वास शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केला.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2015 4:52 am

Web Title: reactions on maharashtra state budget 2015 by fadnavis government
टॅग : Business News
Next Stories
1 कर्जाचा डोंगर आणि योजनांची खिरापत
2 नागरिकांना सरकारवर टीका करण्याचा अधिकार- उच्च न्यायालय
3 बांधकाम व्यवसायात अंडरवर्ल्डचा पैसा; हितसंबंध खणून काढणार -मुख्यमंत्री
Just Now!
X