रसिका मुळ्ये

‘आत्मनिर्भर’ होण्यासाठी आता परदेशी लेखक, संशोधकांचे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाला वावडे असल्याचे दिसत आहे. अभियांत्रिकी विद्याशाखेचा अभ्यास हा भारतीय लेखक आणि प्रकाशकांच्या पुस्तकावरूनच करण्यात यावा, अशा सूचना अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) महाविद्यालयांना दिल्या आहेत.

तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांसाठी परदेशी लेखक, संशोधकांची पुस्तके वापरण्याकडे विद्यार्थ्यांचा कल असतो. अनेक सिद्धांतांवरील मूलभूत संशोधनही परदेशी झाले आहे. मात्र भारतातील भावी अभियंत्यांना ‘आत्मनिर्भर’ होण्यासाठी भारतीय लेखकांचीच पुस्तके अभ्यासावी लागणार आहेत. परिषदेने महाविद्यालयांना भारतीय लेखकांची पुस्तके संदर्भासाठी वापरण्याची सूचना केली आहे. अभियांत्रिकी पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाची पुनर्माडणी परिषदेने २०१८ मध्ये केली. त्यानंतर प्रत्येक घटकानुसार संदर्भ पुस्तकांची यादीही जाहीर केली. त्यामध्ये प्राधान्याने भारतीय लेखकांचा समावेश होता. करोना प्रादुर्भावानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाची घोषणा केली. जागतिक अर्थकारणाच्या पटलावर भारताचे स्थान प्रबळ करण्याचा उद्देश या अभियानांतर्गत असल्याचे जाहीर केले. त्यानुसार आता संदर्भ पुस्तकेही भारतीयच असावीत, असा आग्रह परिषदेने केला आहे.

परिषदेची भूमिका..

‘विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी भारतीय लेखक आणि प्रकाशकांची पुस्तके वापरावीत, जेणेकरून ही पुस्तके आणि लेखकांचा जागतिक स्तरावर प्रसार होईल. त्याचप्रमाणे आत्मनिर्भर भारत निर्माण होण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल ठरेल. भारतीय लेखक आणि प्रकाशकांची पुस्तके वापरण्याची सूचना देऊन ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानात आपले योगदान द्या,’ अशा आशयाचे पत्र परिषदेने महाविद्यालयांना पाठवले आहे.

मोजक्याच पुस्तकांचे पर्याय..

परिषदेने दोन वर्षांपूर्वी जाहीर केलेल्या भारतीय लेखक आणि प्रकाशकांच्या पुस्तकांच्या यादीमध्ये प्रत्येक विषयासाठी दोन किंवा तीनच पुस्तकांचे पर्याय देण्यात आले आहेत. त्यातही काही पुस्तकांचे सहलेखक परदेशी आहेत, तर काही पुस्तकांचे प्रकाशक परदेशी आहेत. त्यामुळे भारतीय पुस्तकेच वापरायची झाल्यास विद्यार्थ्यांसाठी अगदी मोजकेच पर्याय उपलब्ध असणार आहेत.