माननीय उद्धव ठाकरे,
नमस्कार.
गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होणार म्हणजे होणारच अशी गर्जना तुम्ही केल्याचे शुक्रवारच्या ‘सामना’ मध्ये वाचले. ते वाचून मनात काही प्रश्न निर्माण झाले. त्यासाठी हे पत्र.
गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करायचा म्हणजे भर रस्ता अडवून पादचारी आणि वाहतुकीला अडथळा आणायचा का? कानठळ्या बसवणा-या डीजेच्या आवाजात, दारु पिऊन अश्लील नाच करत मिरवणूक काढायची का? वर्गणीच्या नावाखाली खंडणी जमवायची का? वेळेची मर्यादा न पाळता सर्वांच्या सहनशीलतेचा अंत पाहात आगमन आणि विसर्जनाची मिरवणूक काढायची का? उंचच उंच मूर्ती तयार करायच्या का? पर्यावरणाला हानीकारक असलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर करायचा का? सध्या काही अपवाद वगळता याच प्रकारे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होत आहे, हे कटू असले तरी वास्तव आहे. या अशा गणेशोत्सवाला तुम्ही ‘धुमधडाका’ म्हणत असाल तर दुर्दैव आहे.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे धर्मशास्त्रात किंवा ग्रंथात या प्रकारे गणेशोत्सव साजरा करावा, असे कूठे लिहून ठेवले आहे का? नाही. आणि जरी लिहिलेले असते तरी त्याला ते वाईट, अनिष्ट आहे म्हणून विरोध करण्याचे धाडस तुम्ही आणि तुमच्यासारख्या अन्य राजकीय नेत्यांनी दाखवले पाहिजे.
गेल्या काही वर्षांत फक्त गणेशोत्सवच नाही तर दहीहंडी, नवरात्रौत्सव यातील उत्सव, पावित्र्य संपून त्याचे व्यापारीकरण झाले आहे. उत्सव संपून त्यात हैदोस, धुडगूस सुरु आहे. (काही अपवाद वगळता) पण बहुतेक ठिकाणी हे उत्सव म्हणजे ‘मनी-मसल पाॅवर’ दाखवण्याचा एक व्यवसाय झाला आहे. हे तर नाकारता येणार नाही.
दरवर्षी मंडपाना परवानगी मिळते, मग यंदाच असा बाऊ का? असा प्रश्न तुम्ही विचारला आहे. तो तर हास्यास्पद आहे. म्हणजे इतके दिवस माझा मुलगा दारु, सिगरेट, चरस, गांजा अशी सगळी व्यसने करत होता, तेव्हा त्याला कोणी काही बोलले नाही, मग आजच हे सर्व वाईट आहे ते तू करु नको असे का सांगितले? म्हणण्यासारखे आहे. आपल्या वाईट सवयी, अपप्रवृत्ती दूर करायच्या असतील तर त्याची सुरुवात आपण आपल्याच घरापासून केली पाहिजे ना?
मशिदीवरील भोंगे, रस्त्यावर नमाज पढणे हे बंद झालेच पाहिजे. त्याचे समर्थन करणारही नाही आपल्या धर्मात, उत्सवात काही चुकीचे होत असेल तर ते आपणच दूर करायला पाहिजे. हिंदू धर्मातील अनिष्ट रुढी, परंपरा हिंदू धर्मातीलच समाज सुधारकांनी तेव्हा विरोध पत्करून दूर करण्यासाठी प्रयत्न केले हे विसरून चालणार नाही. आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे ही समाज सुधारक होते. ते आज असते तर त्यांनीही गणेशोत्सवाला आज जे स्वरुप प्राप्त झाले आहे त्याविषयी कठोर शब्दात कोरडेच ओढले असते. तो वारसा आपल्याला लाभलेला आहे. प्रसंगी लोकानुनय न करता कटू निर्णय घेऊन समाजाला वेगळे वळण लावणे हे नेत्याचे खरे काम असते. आपण त्यापासून दूर जात आहात.
तुम्ही सध्या जी भूमिका घेतली आहे ती बहुसंख्य हिंदूना, मराठी माणसांना आवडेल, त्यांनाही तेच हवे आहे, असे तुम्हाला वाटत असेल, तुमच्या सल्लागारांनी तसा समज करुन दिला असेल तर तो साफ चुकीचा आहे. सुजाण, समंजस आणि सुसंस्कृत नागरिकांना हा असा गणेशोत्सव नको आहे, ही माझ्यासारख्या अनेकांची भावना आहे.
आम्हाला उत्सव हवा आहे धुडगूस आंणि हैदोस नकोय.
असो.
आपला
शेखर जोशी
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 11, 2018 8:00 am