ऑडिओ बुक्स खरेदीलाही पसंती; विक्री ३० ते ६० टक्क्यांनी वधारली

सुहास जोशी, लोकसत्ता

मुंबई : टाळेबंदीत वेळेचा सदुपयोग करण्यासाठी अनेकांनी घरातील पुस्तकांच्या कपाटातील धूळ झटकली, तर काही जणांनी याच काळात पुस्तकांसाठी ई-माध्यमाचा आधार घेतल्याचे दिसून येते. मुद्रित माध्यमातील पुस्तके विकत घेण्याचा पर्याय सध्या उपलब्ध नसताना पट्टीचे वाचक ई-बुक्स आणि ऑडिओ बुक्सकडे वळत आहेत. या साहित्याच्या विक्रीमध्ये सुमारे ३० ते ६० टक्के वाढ झाल्याचे प्रकाशकांनी सांगितले.

मेहता प्रकाशनाची सुमारे १४०० ई-बुक्स किंडलवर असून, २४ मार्चनंतर दररोजच्या ई-बुक विक्रीमध्ये सुमारे ६४ टक्क्यांची वाढ झाल्याचे सुनील मेहता यांनी सांगितले. मनोविकास प्रकाशनाची सुमारे ३०० पुस्तके ई स्वरूपात किंडलवर उपलब्ध असून टाळेबंदीच्या सुरुवातीच्या काळात प्रतिसाद वाढल्याचे आशीष पाटकर यांनी सांगितले. हा प्रतिसाद सुमारे १५ ते २० टक्क्याने वाढल्याचे त्यांनी सांगितले. तर डायमंड प्रकाशनाच्या पुस्तकांच्या किंडलवरील प्रतिसादात ३० टक्क्यांनी वाढ झाल्याचे नीलेश पाष्टे यांनी सांगितले. ऑडिओ बुक्स ही संकल्पना गेल्या दोन वर्षांत रुळत असून स्टोरी टेल या अ‍ॅपच्या माध्यमातून सुमारे १५०० मराठी पुस्तकांचा श्रवणानंद घेता येतो. टाळेबंदीच्या काळात या मंचावरील नवीन सभासदांच्या नोंदणीत वाढ झाल्याचे, स्टोरी टेलचे प्रसाद मिरासदार यांनी सांगितले. टाळेबंदीच्या काळात समाजमाध्यमांचा वापर करून पॉडकॉस्ट, व्हिडीओद्वारे वाचकांना पुस्तकांशी जोडण्याचा उपक्रम रोहन प्रकाशनाने सुरू केला असून त्याला उत्तम प्रतिसाद लाभत असल्याचे रोहन चंपानेरकर यांनी सांगितले.

सवलतींचे आकर्षण..

अ‍ॅमेझॉनने ई-बुक्सच्या प्रसारासाठी अनेक प्रकाशकांकडून दहा पुस्तके मोफत स्वरूपात उपलब्ध करून देण्याची सूचना केल्याचे सुनील मेहता यांनी सांगितले. सध्या मूळ मराठी आणि अनुवादित पुस्तकांची मागणी वाढली आहे. ई बुक्समध्ये युव्हाल नोहा हरारी यांच्या ‘सेपिअन्स’च्या अनुवादाला पसंती सर्वाधिक आहे.