टाळेबंदीच्या काळातही यंत्रणांची नियमित तपासणी, स्वच्छता

रेश्मा राईकवार, लोकसत्ता

मुंबई : नाटय़-चित्रपटांचे खेळ कधी सुरू होतील, नाटय़गृहे आणि चित्रपटगृह पुन्हा उत्साहाने कधी भरतील, आतापर्यंतचे नुकसान कसे भरून काढायचे अशा अनेक चिंता मनात डोकावत असतानाही मुंबईसह महाराष्ट्रातील चित्रपटगृहे आणि नाटय़गृहांची त्याच आत्मीयतेने देखभाल केली जात आहे. कलाविश्व सुरू होईल तेव्हा प्रेक्षकांना सिनेमाचा आणि नाटकाचा तोच आनंद मिळावा यासाठी मालक आणि कर्मचारी प्रयत्नशील आहेत.

देशात चित्रपट पडद्यांची संख्या ९५०० इतकी आहे. या चित्रपटगृहांमधून दिवसाला प्रादेशिक, हिंदी आणि हॉलीवूड चित्रपटांचे जे चार-पाच खेळ रंगतात त्यातून दररोज ३० कोटी रुपयांची उलाढाल होते. आवश्यक साहित्य, यंत्रसामग्री यासाठी मोठी गुंतवणूक केली जाते. साध्या छोटय़ा चित्रपटगृहात जरी चित्रपट दाखवायचा झाला तर २ के प्रोजेक्टरसाठी कमीतकमी ९ लाख आणि मोठय़ा चित्रपटगृहासाठी ४० लाख एवढा खर्च येतो. त्यामुळे प्रेक्षकांविना ही चित्रपटगृहे बंद असली तरी त्यातली यंत्रणांची दररोज तपासणी करावी लागते, अशी माहिती ‘सिनेमा ओनर्स अ‍ॅण्ड एक्झिबिटर्स असोसिएशन ऑफ इंडिया’चे अध्यक्ष नितीन दातार यांनी दिली. सध्या उत्पन्न शून्य, खर्चाचा बोजा आणि कर्मचाऱ्यांची वानवा अशा अवस्थेतही खेळ रंगण्यासाठी कर्मचारी राबत आहेत.

काळजी कशी?

चित्रपटगृहात प्रोजेक्टर, अ‍ॅम्प्लिफायर, साऊंड सिस्टिम, सव्‍‌र्हर्स, कॉम्प्युटर्स अशा सगळ्याच यंत्रणा असतात. त्या रोजच्या रोज सुरू करून पाहाव्या लागतात. सेन्ट्रलाइज्ड एसी असल्याने जास्त फटका बसतो. याशिवाय, उंदीर येऊ नयेत किंवा वाळवी लागू नये म्हणून रोज साफसफाई करावी लागते. टाळेबंदीच्या काळातही हे कर्मचारी यंत्रणांची काळजी घेत आहेत.

नाटय़गृहांचीही निगा

नाटय़गृहांच्या अवस्थेबद्दल एरव्ही कुरबुरी ऐकू येतात. मात्र आताच नाही तर तुम्ही कधीही आमच्या नाटय़गृहात या, ते तुम्हाला नीटनेटकेच दिसणार, अशी खात्री यशवंत नाटय़गृहाचे व्यवस्थापक सुनील कदम देतात. ‘मी स्वत: एक दिवसाआड नाटय़गृहात जातो. तिथली साफसफाईची कामे करून घेतो. ध्वनी यंत्रणा, वातानुकूलन यंत्रणा, खुर्च्या सगळ्यांचीच काळजी घ्यावी लागते. आमचे बहुतेक कर्मचारी दूर राहणारे असल्याने त्यांना रोज येणे शक्य होत नाही. त्यांना रोज बोलावणेही जोखमीचे आहे. मात्र माटुंगा आणि वडाळा, दादरला राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही कामे रोजच्या रोज केली जातात, असे कदम यांनी सांगितले. उत्पन्न नसल्यामुळे सध्या आमचे पगारही नाहीत, पण आमचे घर असल्यासारखे आम्ही नाटय़गृहाची काळजी घेत आहोत, असे त्यांनी सांगितले.

सध्या चित्रपटगृह बंद असले तरी जेव्हा प्रेक्षक येतील तेव्हा त्यांना इथे सुरक्षित वातावरणात पूर्वीचाच अनुभव घेत आनंदाने चित्रपट पाहता यायला हवा. त्यामुळे करोनासंबंधित नियमांनुसार चित्रपटगृहांचे निर्जंतुकीकरण चित्रपटगृह पुन्हा सुरू करताना केले जाणार आहे. पण आत्ताही आम्ही रोज साफसफाई करत आहोत. पावसाळी गळती, दुरुस्ती अशी कामेही सुरू आहेत.

– कपिल भोपटकर, भारतमाता चित्रपटगृहाचे मालक