राज्य सरकारने दरवर्षीप्रमाणे ‘रेडी रेकनर’च्या दरात ३० ते ४० टक्क्यांची वाढ केली असून आज, १ जानेवारीपासून ती लागू होत आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यात घरांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे आलिशान सुविधा असलेल्या गृहसंकुलांसाठी प्रथमच जादा रेडी रेकनर दर आकारण्यात येणार आहे, असे समजते.
राज्य सरकार आर्थिक अडचणीत असून आता मिळेल त्या मार्गाने तिजोरी भरण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या वर्षी रेडी रेकनरच्या दरात २० ते ३० टक्यांनी वाढ करण्यात आली होती. मात्र, बिल्डर आणि लोकांकडूनही त्यास मोठय़ा प्रमाणात विरोध झाल्यानंतर निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर ही दरवाढ कमी करण्यात आली होती. यावेळी मात्र रेडी रेकनरच्या दरात भरीव वाढ करण्याच्या सूचना मंत्रालयातून देण्यात आल्या होत्या. त्यानुसार मुद्रांक व दस्तनोंदणी महानिरीक्षक कार्यालयाने रेडी रेकनरच्या दरात भरीव वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे ५० सव्‍‌र्हे नंबरचा एक विभाग असतो. त्यासाठी एकच रेडी रेकनर दर निश्चित करण्यात येतो.
मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर या मोठय़ा शहरांबरोबरच आता जिल्हा आणि तालुका मुख्यालयांच्या ठिकाणीही घरांच्या किंमतीत मोठय़ाप्रमाणावर होणारी वाढ लक्षात घेऊन तेथेही रेडी रेकनरच्या दरात वाढ करण्यात आल्याचे समजते. याबाबत मुद्रांक व दस्तनोंदणी महानिरीक्षक श्रीकर परदेशी यांच्याशी संपर्क साधला असता, १ जानेवारीपासून नवीन दर लागू झाल्यानंतरच भाष्य करता येईल, असे सांगत त्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला.

*रेडी रेकनरच्या दरात मुंबईत सरासरी ४० टक्यांनी वाढ करण्यात आली असून ठाण्यात आणि पुण्यात २५ ते ३० टक्यांपर्यंत वाढ झाली आहे. ज्या भागात घरांचे दर जास्त आहेत, तसेच ज्या भागात घरांची संख्या वाढत आहे, त्या भागातील रेडी रेकनरच्या दरात सर्वाधिक वाढ करण्यात आली आहे.

*मोठय़ा रस्त्यांना लागून असलेल्या भागातील घरांच्या रेडी रेकनर दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. अशाच प्रकारे मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील मोक्याच्या परिसराचे रेडी रेकनरचे दर वाढविण्यात आले आहेत.

*यावेळी सुमारे ४ हजार चौरस फुटापेक्षा अधिक बांधकाम असलेल्या तसेच जलतरण तलाव, क्लब हाऊस, व्यायामशाळा, जॉगिंग ट्रॅक अशा सुविधा असणाऱ्या गृह संकुलांसाठी वेगळे रेडी रेकनर दर ठेवण्यात आले आहेत. ही वाढ ६० टक्यांपर्यंत असेल.