राज्य सरकारचा मुंबईकरांना दिलासा
मुंबईच्या रेडी रेकनरच्या दरात दरवर्षीप्रमाणे या वेळी सरसकट वाढ करण्यात येणार नसल्याची ग्वाही महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिल्याने स्वमालकीच्या घराची स्वप्ने पाहणाऱ्या सर्वसामान्य मुंबईकरास दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. मुंबईच्या रेडी रेकनर दरात सरसकट वाढ केल्यास मालमत्ता कराचा वाढीव बोजा सामान्य मुंबईकरावर पडेल व त्याचे घराचे स्वप्न महाग होईल, असे सांगत मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशीष शेलार यांनी विधानसभेत केलेल्या मागणीस राज्य शासनाने अनुकूलता दाखविल्याचे संकेत मिळत आहेत.
याआधी मुंबईच्या रेडी रेकनरच्या दरात दर वर्षी सरसकटपणे १५ ते २० टक्के वाढ केली जात असे. नव्या वर्षांत तशी वाढ झाल्यास मुंबईतील घरबांधणी, पुनर्विकास, आणि मालमत्ता कर यांवर परिणाम होईल अशी भीता शेलार यांनी विधानसभेत एका चर्चेदरम्यान व्यक्त केली. त्यावर सकारात्मक भूमिका मांडताना महसूलमंत्री खडसे म्हणाले की, रेडी रेकनर दर वाढविल्यास त्याचा मालमत्ता करवाढीवर कसा परिणाम होईल याचाही अभ्यास करण्यात येईल. त्यामुळे सरकसट निर्णय घेतला जाणार नाही.
त्याआधी, मुंबईच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी आशीष शेलार यांच्या नेतृत्वाखाली भाजप आमदारांनी नागपूर येथे एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानीही त्यांची भेट घेतली. रेडी रेकनरच्या दरवाढीसंदर्भात त्याआधी शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही लक्ष वेधून दरवाढ करू नये, अशी मागणी केली होती. मुंबईत अनेक झोपडपट्टय़ा व जुन्या इमारतींच्या पुनर्विकास योजनांना सरकारकडून चालना दिली जात असल्याने सामान्य मुंबईकराचे घराचे स्वप्न दृष्टिपथात येऊ पाहात आहे. तसेच अनेक घरबांधणी योजनाही पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. अशा वेळी रेडीरेकनरचे दर वाढल्यास या योजना रखडतील, अशी भीतीही शेलार यांनी व्यक्त केली.
रेडी रेकनर वाढल्यामुळे घरांच्या किमती वाढतील, मालमत्ता कर वाढेल व घरे विकली जाणार नाहीत, साहजिकच त्यामुळे स्टॅम्प डय़ूटीच्या महसुलावरही त्याचा परिणाम होईल, याकडे त्यांनी मुख्यमंत्री व महसूलमंत्र्यांचे लक्ष वेधले.

शेलार यांची मागणी
मुंबईचा मालमत्ता कर हा रेडी रेकनरच्या दराशी निगडित असल्याने, रेडी रेकनरचा दर वाढल्यास मालमत्ता करही वाढेल व त्याच्या वाढीव ओझ्यामुळे सामान्य मुंबईकराचे घराचे स्वप्न कोलमडेल, त्यामुळे मुंबईच्या रेडी रेकनर दराबाबत सकारात्मक विचार करावा, अशी मागणी शेलार यांनी केली.