धकाधकीच्या जीवनात अनेक कुटुंबांचा स्वयंपाकघरात घालविला जाणारा वेळ कमी झाला आहे. यामुळे रेडी टू कुकअशा उत्पादनांना चांगलीच मागणी वाढली आहे. हे करण्यास सोईस्कर असले तरी त्यामध्ये अन्न संवर्धन करण्यासाठी वापरण्यात येणारी रसायने आरोग्यात हानीकारक असतात. याचबरोबर त्यावर करण्यात आलेल्या प्रक्रियेमुळे अनेकदा अन्नपदार्थाची चवही चांगली लागत नसल्याने अनेकांनी अशा उत्पादनांकडेही पाठ फिरवण्यास सुरुवात केली. पण लोकांना या पर्यायाची गरजही होती. याचाच विचार करून मुंबईत फिंगरलिक्स नावाची एक कंपनी सुरू झाली आणि त्यांनी या सर्वातून एक नवा पर्याय कॉर्पोरेट गृहिणींसमोर ठेवला आहे.

अशी झाली सुरुवात आयआयएम बेंगळुरू येथून शिक्षण पूर्ण केल्यानंतर इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच नोकरी करणाऱ्या श्रीपाद नाडकर्णी आणि श्रीकृष्ण भांबरे यांनी कालांतराने नोकरी सोडून स्वत:चा सल्लागार व्यवसाय सुरू केला. विविध कंपन्यांना विविध स्तरांवर सल्ला देत असताना त्यांना एक अडचण जाणवली ती म्हणजे बाजारात घरची चव देणारे रेडी टू कुक उत्पादने उपलब्ध नाहीत. मग त्यांनी यावर अभ्यास करण्यास सुरुवात केली. अनेकांना सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या उत्पादनांमध्ये वापरण्यात येणारी रसायने आणि त्याची चव याची समस्या जाणवत होती. यावर तोडगा म्हणून ताजे अन्नपदार्थ कसे देता येतील यावर विचार सुरू झाला. यातच त्यांच्या या कामात आयटीसी या पंचतारांकित हॉटेल्समधील बल्लभाचार्य अभिजित बेर्डे सहभागी झाले. त्यांच्या अनुभवाच्या जोरावर अन्नपदार्थ रेडी टू कुक असले तरी त्याचे संवर्धन करण्यासाठी कोणत्याही प्रकारची रसायने न वापरता नेमकी काय प्रक्रिया करता येईल यावर विचार सुरू झाला. यातून विशिष्ट प्रक्रिया करून अन्नपदार्थ पाच दिवसांपर्यंत चांगल्या प्रकारे ठेवण्याचा पर्याय समोर आला. पुढे कोणते अन्नपदार्थ ठेवायचे यावरही विचार झाला असता दैनंदिन जेवणात चवीने खाल्ले जाणारे पण तयार करण्यासाठी थोडासा वेळ घेणारे अन्नपदार्थ ठेवण्याचा विचार त्यांनी केला आणि सुरुवातीला बारा अन्नपदार्थाची निवड केली. त्याची पाकिटे तयार करून ती बाजारात उपलब्ध करण्यात आली. इतर रेडी टू कुक पदार्थ जेव्हा तीन महिन्यांपासून ते एक वर्षांपर्यंतची समाप्ती तारीख देतात तेव्हा फिंगरलिक्स पाच दिवसांची मुदत देतात. ही उत्पादने बडय़ा ब्रॅण्ड्सच्या रिटेल आउटलेट्समध्ये उपलब्ध असून कंपनीने  हे संकेतस्थळ आणि मोबाइल अ‍ॅपही सुरू केले. या माध्यमातून सध्या पवई व अंधेरी परिसरात ही उत्पादने घरपोच पुरविली जात आहेत. उत्पादन तयार करताना तो पदार्थ तीन ते पाच जणांना पुरेल इतका असतो. यामुळे उत्पादन तयार करत असताना कुटुंबाचा विचार प्रामुख्याने केल्याचे भांबरे सांगतात. या सर्व प्रक्रियेत त्यांच्यासोबत वरुण खन्नाही सहभागी झाले होते.

गुंतवणूक आणि उत्पन्नस्रोत

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी संस्थापकांनी त्यांच्याकडील निधी आणि काही गुंतवणूक बाहेरील गुंतवणूक कंपन्यांमधून उभी केली आहे. सध्या कंपनीकडे १.३ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक असून यातील काही निधी मुंबईत स्वयंपाकगृह उभे केले आहे. उर्वरित निधी कंपनीच्या व्यवसाय वृद्धीसाठी वापरण्यात येणार असल्याचे भांबरे यांनी नमूद केले. तर कंपनीचे उत्पन्नस्रोत हे उत्पादनांच्या थेट विक्रीतून होते तेच आहे.

भविष्यातील वाटचाल

भविष्यात म्हणजे येत्या पाच ते सहा महिन्यांत कंपनी संपूर्ण मुंबई शहरात आपले वितरण जाळे पसरविणार आहे. यानंतर बेंगळुरू, दिल्ली, पुणे यांसारख्या शहरांमध्ये कंपनीची वाटचाल सुरू करण्याचा मानस असल्याचे भांबरे यांनी नमूद केले.

नवउद्यमींना सल्ला

आपण जी समस्या घेऊन व्यवसाय सुरू करत आहोत ती समस्या नेमकी किती मोठी आहे. ती समस्या केवळ आपल्यालाच जाणवते की ती जाणवणाऱ्यांची संख्या खूप आहे. हे समजल्यानंतरच त्या समस्येवर काम करण्यास सुरुवात करा. याचबरोबर आपण त्या समस्येवर जे उत्तर देत आहोत ते किती प्रभावी आहे याचाही विचार करा. तसेच पहिल्या दिवसापासून व्यवसाय नफा कसा कमावेल याचा विचार करा. केवळ निधी उभारला आहे त्यावर अवलंबून राहू नका असा सल्ला भांबरे यांनी दिला.

@nirajcpandit