करोनामुळे तयार फराळ खरेदी करण्याकडे कमी कल; किमतीतही वाढ

मुंबई : करोनामुळे बाहेरच्या व्यक्तीचा स्पर्श झालेल्या वस्तूंची भीती, घरीच फराळ करण्याकडे कल इत्यादी कारणास्तव यंदा दिवाळीचा फराळ घरोघरी तयार होऊ लागला आहे. परिणामी अनेक वर्षांपासून तयार फराळाची विक्री करणाऱ्यांकडील मागणी यावर्षी घटली आहे. तसेच फराळासाठी लागणाऱ्या जिन्नसांच्या किमती वाढल्याने फराळाचे दर वाढले आहेत.

दादरच्या वैशाली सोनवणे गेली तीन-चार वर्षे फराळाची विक्री करतात. दरवर्षी त्यांच्याकडे २० किलो लाडूंची विक्री होते. यंदा ७-८ किलो लाडूंचीच ऑर्डर मिळाल्याचे त्या सांगतात. फराळातील इतर पदार्थाचीही हीच स्थिती आहे. नियमित ग्राहकांकडून मागणी आहे. मात्र, त्यांनीही पदार्थाचे प्रमाण कमी के ले आहे. त्यामुळे गेल्या वर्षी ३०० रुपये प्रतिकिलो (२२ करंज्या) दराने विकल्या जाणाऱ्या करंज्या आकार आणि प्रकारानुसार १५, २०, २५ रुपये प्रतिनग दराने विकाव्या लागत आहेत. म्हणजेच किमतीतही वाढ झाली आहे.

शेव आणि चकलीचा दर गेल्या वर्षी प्रतिकिलो ३०० रुपये होता. मात्र, चकलीसाठी वापरल्या जाणाऱ्या जिन्नसांची किं मत वाढल्याने १०० रुपयांनी दर वाढवावा लागल्याचे वैशाली सांगतात. ४००-५०० रुपये प्रतिकिलो दराने मिळणाऱ्या तुपाची किं मत ७०० रुपये प्रतिकिलोवर गेल्याने तुपातल्या लाडूंची किं मत वाढली आहे. एरव्ही मदतीला येणाऱ्या महिला करोनाच्या भीतीमुळे आल्या नाहीत. त्यामुळे एरव्हीपेक्षा अधिक मेहनत घ्यावी लागत असल्याचे त्या म्हणतात.

सध्या अनेकांकडे काम नाही. फटाक्यांचा धंदाही होणार नाही. त्यामुळे अनेकांनी घरच्या घरी फराळ तयार करून विकण्यास सुरुवात के ली आहे. शिवाय करोनाच्या भीतीने यावर्षी घरी पाहुण्यांचे येणे-जाणे होणार नसल्याने आवश्यक असणारा थोडाफार फराळ घरीच करण्याकडे लोकांचा कल आहे. परिणामी, तयार फराळाची मागणी निम्म्यावर येण्याची शक्यता बोरिवलीच्या हिलोनी जाधव यांनी वर्तवली. प्रत्येक पदार्थामागे १०-२० रुपये वाढल्याचेही त्यांनी सांगितले.

दर्जेदार पदार्थाचे दर स्थिर?

दादरच्या सुखदा सरदेसाई यांनी तयार फराळाची मागणी घटल्याचे मान्य के ले. पण किमतींबाबत त्यांचा अनुभव वेगळा आहे. यावर्षी स्वत: घरी फराळ करण्याकडे अनेकांचा कल आहे. शिवाय घरच्या घरी फराळाची विक्री करणाऱ्यांची संख्या वाढल्याने स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे फराळाची किं मत कमी झाल्याचे त्या सांगतात. पहिल्यांदाच घरी फराळ करणाऱ्यांना किमतींचा अंदाज नसल्याने ते कमी किमतीत विकतात. मात्र दर्जेदार पदार्थाचे दर स्थिर राहतील, असे त्या म्हणाल्या.