03 March 2021

News Flash

खडसेंनी राजीनामा देण्यापूर्वी काय काय घडामोडी घडल्या..

एमआयडीसी जमीन घोटाळ्याचा बोलबाला झाल्यामुळे खडसेंविरुद्धच्या कारवाईला खऱ्या अर्थाने वेग आला.

Eknath Khadse : गेल्या काही दिवसांतील वेगवान घडामोडींमुळे खडसेंवर मंत्रिपद सोडण्याची वेळ आली.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महसूल, उत्पादन शुल्क, वक्फ बोर्ड, दुग्धविकास यांसारखी महत्त्वपूर्ण आणि ‘मलईदार’ खाती सांभाळणारे एकनाथ खडसे यांच्याविरोधात अचानक विविध आरोपांची त्सुनामी सुरु झाली. खडसेंना या त्सुनामीचा चांगलाच तडाखा बसला असून आज त्याची परिणीत त्यांनी आपल्या सर्व मंत्रिपदांचा राजीनामा देण्यात झाली.
खडसे यांच्यावर करण्यात आलेल्या विविध आरोपांत दाऊद इब्राहिमबरोबर संभाषण, जावयाच्या लिमोझिन गाडीचे प्रकरण, निळजे (कल्याण) येथील शासकीय जमीन देण्यासाठी खडसे यांचा निकटवर्तीय गजानन पाटील याने ३० कोटींची लाच मागितली म्हणून अगदी मंत्रालयात अटक व खडसे यांची पत्नी व जावयाकडून भोसरी येथील एमआयडीसीच्या जमिनीची त्रयस्थाकडून खरेदी आदी आरोपांचा समावेश आहे. पुण्यातील एमआयडीसी जमीन घोटाळ्याचा बोलबाला झाल्यामुळे खडसेंविरुद्धच्या कारवाईला खऱ्या अर्थाने वेग आला. याशिवाय, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया खडसेंविरुद्ध उपोषणाला बसल्यामुळे भाजपकडे खडसेंवर कारवाई करण्याशिवाय पर्याय उरला नाही. सुरूवातीला या आरोपांमुळे खडसेंना राजीनामा द्यावा लागेल, असे कोणालाही वाटले नव्हते. मात्र, गेल्या काही दिवसांतील वेगवान घडामोडींमुळे खडसेंवर मंत्रिपद सोडण्याची वेळ आली.

खडसेंचा राजीनामा देण्यापूर्वी काय काय घडामोडी घडल्या याचा आढावा:
* सुरुवातीला भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी खडसेंचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपवला होता. मात्र, गुरूवारी अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर खडसे यांचा निर्णय पक्ष घेईल, असे फडणवीसांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. याप्रकरणी फडवणीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही चर्चा केली.
* महसूल मंत्री एकनाथ खडसे ही राजकीय व्यक्ती असल्यामुळेच त्यांच्याविरूध्द दाऊद फोन प्रकरणी कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यांच्या ठिकाणी आपण असतो तर लगेच आपल्यावर कारवाई झाली असती, असा आरोप हॅकर मनीष भंगाळे यांनी केला.
* शुक्रवारी दुपारी वर्षावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह काहींची याच विषयावर चर्चा झाली. फार दिवस हा विषय चालू ठेवणे पक्षासाठी घातक असल्याचे मत सगळ्यावेळी मांडले गेले.
* केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुंबईत आले. रात्री त्यांनी पक्षाच्या नेत्यांची, मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.
* मंत्रिपद वाचविण्यासाठी खडसे यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना भेटण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भागवत यांनी खडसे यांना भेट नाकारल्याने खडसे पक्षासाठी दखलपात्र राहिले नसल्याचे मानले गेले.
* सर्व घडामोडी सुरू असतानाच जबाबदार कृषिमंत्री म्हणून शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करू द्यावे, असे ट्विट करून खडसे यांनी निदान कृषी खात्याचा कारभार आपल्याकडे राहावा यासाठी प्रयत्न केले.
* आज सकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एकनाथ खडसे यांना दुरध्वनी केला होता. यावेळी त्यांनी खडसेंना मुख्यमंत्र्यांना भेटून राजीनामा देण्यास सांगितले. तुमच्यामुळे पक्षाची अजून बदनामी होऊ नये, यासाठी राजीनामा द्या, असे गडकरींनी खडसेंना सांगितल्याचे समजते.
* आज सकाळी एकनाथ खडसे वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दाखल झाले . त्यानंतर अपेक्षेप्रमाणे त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सुपूर्द केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2016 3:12 pm

Web Title: reasons happenings behind eknath khadse resignation
Next Stories
1 खडसेंच्या जागी बहुजन चेहरा म्हणून मुनगंटीवारांच्या निवडीची शक्यता
2 माझे ४० वर्षांचे राजकीय जीवन उद्ध्वस्त करू पाहणाऱ्यांचा पर्दाफाश करेन- एकनाथ खडसे
3 भाजप बहुजन समाजाच्या नेत्यांना लक्ष्य करतयं; नारायण राणेंचा गंभीर आरोप
Just Now!
X