आतापर्यंत आपण प्रशासकीय सेवेतील अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस यांना लाच घेताना सापळा रचून अटक झाल्याचे पाहिले आहे. पण मुंबईत समता नगरमध्ये बिलकुल याउलट घटना घडली आहे. इथे एका निलंबित पोलीस उपनिरीक्षकाकडून लाच घेताना कपडे व्यापाऱ्याला अटक झाली आहे. रविश प्रेमजी शाह (४८) असे आरोपी कपडे व्यापाऱ्याचे नाव आहे. त्याने निलंबित पोलीस उपनिरीक्षक बिपिन चव्हाण यांच्याकडे दीड लाख रुपयाची लाच मागितली होती.

या प्रकरणात आधी बिपिन चव्हाणने रविश प्रेमजी शाह या कपडे व्यापाऱ्याकडे सेटलमेंटच्या एका प्रकरणासाठी ७५ हजार रुपयांची लाच मागितली होती. रविश शाहने लाचलुचपत खात्यात तक्रार करून पोलीस उपनिरीक्षक बिपिन चव्हाणला लाच घेताना ट्रॅप लावून गजाआड केले.निलंबित झाल्यानंतर बिपिन चव्हाण उत्तर प्रादेशिक कार्यालयात हजेरी लावण्यासाठी यायचा. काही दिवसांनी कपडे व्यापारी आणि पोलीस उपनिरीक्षक यांच्यामधील दुआ असलेला एक मध्यस्थाने पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांच्याशी चर्चा करून प्रकरण मिटविण्यासाठी रविश शाह याच्याशी चर्चा केली.

तेव्हा फिर्यादी असणाऱ्या शाह याने आरोपी पोलीस उपनिरीक्षकाकडे प्रकरण मिटवण्यासाठी दीड लाख रुपयांची मागणी केली. दीड लाखापैकी २५ हजाराचा पहिला हप्ता देण्याचे शाहच्या वतीने मध्यस्थाने पोलीस उपनिरीक्षकाला सांगितले. पण २५ हजार नाही १५ हजाराची तयारी दर्शविली. हे १५ हजार रुपये घेताना कपडे व्यापारी रविश शाह याला समता नगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी अटक केली. लाचखोरीच्या या प्रकरणात आधी कपडे व्यापारी फिर्यादी होता मात्र आता फिर्यादीच आरोपी ठरल्याचा प्रकार समोर आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान आरोपी रविश शाहची जामिनावर सुटका झाली आहे.