शैलजा तिवले

करोना रुग्णालये आणि आरोग्य केंद्रामध्ये सौम्य आणि मध्यम लक्षणे असलेल्या करोनाबाधितांवर आयुष उपचार करण्यास वैद्यकीय व औषधी द्रव्ये विभागाने मान्यता दिली आहे. त्यामुळे आयुर्वेद, होमियोपॅथी आणि युनानी उपचारपद्धतींचा वापर अधिकृतपणे करोनारुग्णांवर करता येईल, तसेच या क्षेत्रातील संशोधनाला वाव मिळेल.

करोनासाठी प्रतिबंधात्मक, लक्षणे नसलेल्या किंवा कोणतेही अन्य आजार नसलेल्या रुग्णांसाठी उपचाराची मार्गदर्शक नियमावली राज्याच्या आयुष कृतिदलाने जाहीर केली होती. आता नव्या नियमावलीनुसार, सौम्य आणि मध्यम प्रकृतीच्या रुग्णांना आयुष उपचार देता येणार आहेत.अर्थात अन्न व औषध प्रशासनाने मान्यता दिलेल्या औषधांचा वापर करावा लागेल. नोंदणीकृत आयुष डॉक्टरांनाच उपचार देण्याची परवानगी असून रुग्णाला स्वत:हून औषधे घेण्यास मात्र या नियमावलीत मनाई केली आहे. तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग, आरोग्य आयुक्तालय, पालिका किंवा जिल्हाधिकारी यांच्या देखरेखीखालील रुग्णालयांमध्येच याचा वापर करता येणार आहे. रुग्णालयाच्या प्रमुखांची यासाठी परवानगी आवश्यक असून कोणत्याही डॉक्टरांना त्यांच्या दवाखान्यात या रुग्णांवर उपचार देण्यास मनाई असेल, असे यात स्पष्ट केले आहे.

आयुष उपचारांना रुग्णालये परवानगी देत नसल्याने याबाबत ठोस पावले उचलण्याचे आदेश केंद्रीय आयुष विभागाने राज्याला दिले होते. अधिकृतरीत्या मान्यता नसल्याने संशोधनासाठी परवानगी मिळाली असली तरी रुग्णालयांमध्ये मात्र औषधांचा वापर करता येत नव्हता. त्यामुळे अनेक संशोधनांच्या प्रक्रिया रखडलेल्या होत्या. आता औषधांच्या चाचण्या करणे शक्य होणार होईल, असे कृतिदलाचे सदस्य डॉ. जसवंत सिंग यांनी व्यक्त केले. देशभरात करोना साथीच्या काळात मार्च १ ते जून २५ या काळात करोनावरील आयुर्वेद औषधांच्या वैद्यकीय चाचण्यांसाठी ५८ संशोधनांची नोंदणी झाली आहे.

गंभीर प्रकृतीच्या रुग्णांसाठी ..

लक्षणांनुसार औषधे आणि मात्रा अधिकृतरीत्या मार्गदर्शक नियमावलीतून जाहीर केल्याने डॉक्टरांना उपचारांची दिशा मिळेल. शिवाय राज्यातील डॉक्टरांना उपचाराबाबत प्रशिक्षण देण्यासाठी ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रमही घेण्यात येणार आहे. गंभीर प्रकृतीच्या रुग्णांवरही आयुष उपचार करण्याची परवानगी दिलेली असून याची मार्गदर्शक नियमावलीही लवकरच जाहीर होईल, असे डॉ. उदय कुलकर्णी यांनी सांगितले.

विमा परताव्यासाठी..

आयुषची औषधेही विमा योजनेत समाविष्ट केलेली आहेत. अधिकृतरीत्या कृतिदलाने औषधांची यादी जाहीर केल्याने रुग्णांना या औषधांचा विमा परतावाही मिळण्यास मदत होईल. सौम्य आणि मध्यम प्रकृतीच्या रुग्णांना आयमुषच्या औषधांसाठी जवळपास १० ते १२ हजार रुपये खर्च येण्याची शक्यता आहे.

ज्या करोना आरोग्य केंद्र किंवा रुग्णालयांमध्ये आयुष उपचार दिले जातील, त्या रुग्णालयांबाहेर ‘आयुष उपचार उपलब्ध’ असा फलक दर्शनी भागात लावावा, अशी सूचनाही या नियमावलीत आहे.

करोना साथीच्या काळात इतर आजारांवर उपचार करणाऱ्या पंचकर्म केंद्रांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून काय काळजी घेता येईल, याची नियमावलीही यात नमूद केली आहे.

होणार काय?

नव्या निर्णयानुसार करोना काळजी केंद्र(सीसीसी), करोना रुग्णालये (डीसीएच) आणि करोना आरोग्य केंद्रामध्ये (डीसीएचसी) उपचार घेत असलेल्या रुग्णाला त्याच्या इच्छेनुसार अधिकृतरीत्या आयुष उपचार देण्याची परवानगी मिळाली असल्याचे राज्याच्या आयुष कृतिदलाचे प्रमुख डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले.

अस्पष्टता दूर..

केंद्र सरकारने करोनाबाधितांवर आयुष उपचारांना परवानगी दिली असली तरी करोना रुग्णालयांमध्ये त्यांच्या वापराबाबत अस्पष्टता होती. अलोपॅथीसह आयुषची औषधे घेण्यासाठी संबंधित डॉक्टरांची परवानगी घ्यावी लागत होती. त्याचबरोबर काही रुग्णालयांमध्ये रुग्ण किंवा नातेवाईकांकडून लेखी विनंती करणे आवश्यक होते. त्यानंतरही हे उपचार रुग्णालयांकडून अधिकृतरीत्या दिले जात नव्हते. रुग्णांना स्वत:च्या जबाबदारीवर ती घ्यावी लागत होती. रुग्णालयाकडून उपचार नोंदीत त्यांचा उल्लेख केला जात नसे.