गणेशगल्लीतील स्फोटातील दोन जखमींचा मृत्यू; साराभाई इमारतीवर शोककळा

गणेशगल्लीतील साराभाई इमारतीत रविवारी झालेल्या सिलिंडर स्फोटाच्या धक्कय़ातून अद्याप रहिवासी सावरलेले नाहीत. या स्फोटातील १६ जखमींपैकी दोघांचा मृत्यू झाला असून अन्य १४ जण जखमी आहेत.

ज्या घरात आग लागली त्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर जेवण तयार करण्याची सामग्री ठेवलेली होती. त्यामुळे  या प्रकरणी चौकशी करण्याची सूचना अग्निशमन विभागाने विभाग कार्यालयाला केली आहे.

मृतांपैकी सुशीला बांगरे या तेथे एकटय़ा राहत होत्या. त्यांच्या पार्थिवावर शेजाऱ्यांनी अंत्यसंस्कार केले.

लालबागच्या साराभाई  या १०० वर्षे जुन्या इमारतीत रविवारी सिलिंडरचा स्फोट झाला आणि त्यात १६ जण होरपळले. त्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे.

ज्या घरात स्फोट झाला त्याच्या बाजूच्या खोलीत राहणाऱ्या सुशीला बांगरे (वय ६२) या ७० ते ८० टक्के भाजल्या होत्या. रविवारी रात्रीच त्यांचा उपचारादरम्यान केईएम रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने इमारतीतील सर्व रहिवासी हळहळले. सुशीला या एकटय़ाच राहत होत्या. त्या अविवाहित होत्या. पूर्वी त्या आपल्या भावासोबत राहत असत. मात्र भावाच्या मृत्यूनंतर त्या एकाकी होत्या. त्यांना जवळचे असे कोणीही नातेवाईक नाही. मृत्यूनंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी शेजाऱ्यांनी पार पाडल्याची माहिती रहिवासी किरण खातू यांनी दिली.

या स्फोटातील आणखी एक जखमी, करीम (५०) यांचा  रविवारी मध्यरात्री केईएममध्ये मृत्यू झाला. करीम ५० टक्के भाजले  होते आणि त्यांच्या डोक्यालाही गंभीर इजा झाली होती. ते राणे यांच्या कॅटरिंग व्यवसायात काम करत असत. राणे यांच्या मुलीच्या लग्नासाठी हे कर्मचारी इथे आले होते, अशीही माहिती रहिवाशांनी दिली.

इमारतीच्या दुरुस्तीची मागणी

दुसऱ्या मजल्यावर ही दुर्घटना घडलीत. हा  मजला वगळता  पहिल्या, तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरील रहिवासी रविवारी रात्रीपासूनच तेथे परतले आहेत. मात्र इमारत शंभर वर्षे जुनी असल्यामुळे इमारतीची संपूर्ण दुरुस्ती करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.

दरम्यान, अग्निशमन दलाने केलेल्या चौकशीच्या शिफारशीबाबत विभाग कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही त्यांची बाजू समजू शकली नाही.

पाच जणांची प्रकृती गंभीर

केईएममधील आणखी पाच रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. ते ५० ते ८० टक्के भाजलेले आहेत. किरकोळ भाजलेल्या तीन जणांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना घरी सोडले जाणार असल्याची माहिती केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली. मसिना रुग्णालयात उपचार घेत असलेले एकाच कुटुंबातील आई-वडील, मुलगा आणि मुलगी यांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. यांच्यातील वडील आणि मुलगा हे ९२ ते ९५ टक्के भाजले असून मुलगी आणि आई ६० टक्के भाजलेल्या आहेत, अशी माहिती मसिना रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

पिता-पुत्राविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

मुंबई : लालबाग येथील साराभाई इमारतीतील सिलिंडर स्फोटास कारणीभूत ठरल्याप्रकरणी मंगेश राणे, त्यांचा मुलगा यश यांच्याविरोधात काळाचौकी पोलिसांनी सदोष मनुष्यबधाचा गुन्हा नोंदवला आहे.

रविवारी सकाळी घडलेल्या या स्फोटात दोन जणांचा मृत्यू झाला, तर १४ जण जखमी झाले. जखमींवर मसीना, के ईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्यापैकी काहींची प्रकृ ती चिंताजनक आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोकु ळसिंह पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, राणे यांचा कॅ टरींगचा व्यवसाय आहे. स्फोट घडला त्या घरात व्यावसायासाठी लागणारे साहित्य आणि गॅस सिलिंडर होते. इमारतीतील काही व्यक्तींच्या जबाबातून पुढे आलेल्या माहितीनुसार स्फोट घडण्याआधी इमारतीतील काही व्यक्तींना गॅस गळतीची चाहूल लागली होती. काहींनी गळतीबाबत राणे यांना सूचित केले होते. मात्र पुढील हालचाल करण्याआधीच स्फोट झाला. या प्रकरणात आरोपी करण्यात आलेले पिता-पूत्र स्फोटात गंभीर जखमी झाले आहेत. रुग्णालयातून सोडल्यानंतर त्यांना अटक केली जाईल, असे पाटील यांनी सांगितले. स्फोटामुळे इमारतीतील काही घरांची पडझड झाली, तसेच आगीमुळे नुकसान झाले.