मागील दहा महिन्यांपासून बंद असलेल्या चेंबूर ते वडाळा या मोनो रेल्वेच्या मार्गिका सुरू करण्यासाठी १ सप्टेंबरचा मुहूर्त मिळाला आहे. मात्र या मार्गावरील मोनोच्या एका फेरीसाठी  ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’ला (एमएमआरडीए) पूर्वीपेक्षा अधिक पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. फेरी दराबाबत तोडगा काढण्यासाठी नेमलेल्या एक सदस्यीय समितीने आपल्या अहवालात कंत्राटदाराला पूर्वीपेक्षा वाढीव फेरी दर देण्याची सूचना करण्यात आली आहे. त्याचबरोबर तूर्तास तिकिटांचे दर वाढवू नयेत, अशीही शिफारस अहवालात करण्यात आली आहे.

फेब्रुवारी २०१४ रोजी प्रवाशांच्या सेवेत रुजू झालेल्या देशातील पहिल्या मोनोचा पहिला टप्पा प्रवाशांच्या पुरेशा प्रतिसादाअभावी रडतखडत सुरू होता. त्यातच नोव्हेंबर २०१७ मध्ये म्हैसूर कॉलनी स्थानकात मोनोला आग लागली. या आगीत मोनोचे २५ कोटींचे नुकसान झाले. तेव्हापासून मोनोच्या पहिल्या टप्प्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. मोनो रेल्वेचे व्यवस्थापन पाहणाऱ्या ‘लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो-स्कोमी इंजिनीअरिंग’ (एलटीएसई) या कंपनीसोबतच्या कंत्राटाचा कालावधी संपल्यानंतर ‘एमएमआरडीए’ने चार वेळा निविदा काढल्या होत्या. मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

त्यानंतर आता ‘एमएमआरडीए’ पुन्हा ‘एलटीएसईच्या’ मदतीने १ सप्टेंबरपासून मोनोची चेंबूर ते वडाळा ही मार्गिका सुरू करण्याचा निर्णय घेतला. या मार्गावर चाचणी सुरू आहे. मात्र मोनोला पुन्हा धावती करण्यासाठी ‘एलटीएसईने’ एका मोनोच्या फेरीसाठी एमएमआरडीएकडे १८ हजार रुपयांची मागणी केली आहे. पूर्वी मोनोच्या एका फेरीसाठी केवळ ४६०० रुपये कंत्राटदाराला ‘एमएमआरडीए’कडून देण्यात येत होते. एका फेरीसाठी १८ हजार रुपये मोजण्यास ‘एमएमआरडीए’ तयार नाही. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी मध्य रेल्वेचे माजी महाव्यवस्थापक सुबोध जैन यांची एक सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. या समस्येबाबत शिफारस करण्याची जबाबदारी या समितीकडे सोपविण्यात आली होती. समितीने आपला अहवाल सादर केला असून सुचविलेला फेरी दर कंत्राटदार मान्य करेल अशी आशा असल्याची माहिती ‘एमएमआरडीए’चे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांनी दिली. तसेच पूर्वीच्या तुलनेत फेरी दरामध्ये वाढ करण्याची सूचना अहवालातून केल्याचे त्यांनी सांगितले.

खर्च कमी करण्यासाठी सूचना

कंत्राटदाराने मागितलेला १८ हजार रुपये प्रति फेरी दर हा आर्थिकदृष्टय़ा परवडणारा नाही. तरी पूूर्वीच्या ४६०० रुपये प्रति फेरी दरापेक्षा अधिक दर कंत्राटदाराला देण्याची सूचना केल्याची माहिती सुबोध जैन यांनी दिली. तसेच फेरी दर इतक्यात उघड करणार नसल्याचे सांगून त्यांनी प्रति प्रवासी प्रति किलोमीटर अडीच रुपये या हिशेबाने फेरी दराबाबत निर्णय घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. यासाठी दिल्ली आणि घाटकोपर-वर्सोवा मेट्रो मार्गिकांच्या फेरी दराचा अभ्यास केल्याचे जैन म्हणाले. शिवाय खर्च कमी करण्यासाठी तीन पाळीत काम करण्यापेक्षा मोनोच्या गाडय़ा कमी असल्याने दोन पाळीतच कर्मचाऱ्यांना काम करण्याची सूचना केल्याची माहिती जैन यांनी दिली. तसेच सुरुवातीला मिळणारा प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेता त्यानंतरच तिकिटांच्या दरांमध्ये वाढ होणे गरजेचे असल्याची सूचना त्यांनी अहवालातून केली आहे.