कुलगुरूंची उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाला विनंती

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवांच्या नियुक्तीचा फेरविचार करण्याची विनंती कुलगुरू डॉ. पेडणेकर यांनी केली, मात्र उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने त्याची दखल घेतली नाही. दरम्यान या वादातच कुलसचिव डॉ. रामदास आत्राम यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला. कुलगुरूंनी नियुक्तीवर आक्षेप घेतला असला तरी अधिकाऱ्यांनी मात्र त्यांचे आवर्जून स्वागत केले.

विद्यापीठाचे यापूर्वीचे कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांचे जुलैमध्ये निधन झाले. त्यानंतर डॉ. बळीराम गायकवाड यांच्याकडे तात्पुरता पदभार सोपवण्यात आला. पूर्णवेळ कुलसचिवांची नियुक्ती करण्यासाठी विद्यापीठाने शासनाला विनंती केली होती. शासनाने नागपूर येथील शासकीय विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. रामदास आत्राम यांची मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव म्हणून नुकतीच नियुक्ती केली. ही नियुक्ती एक वर्षासाठी प्रतिनियुक्तीने करण्यात आली आहे. त्यानुसार डॉ. आत्राम यांनी शुक्रवारी पदभारही स्वीकारला.

मात्र त्यापूर्वी शुक्रवारी डॉ. पेडणेकर यांनी नियुक्तीचा फेरविचार करण्यात यावा, असे पत्र उच्चशिक्षण विभागाच्या सचिवांना पाठवले. त्यांच्या पत्राची दखल विभागाने घेतलीच नाही. शुक्रवारी सायंकाळपर्यंत थांबूनही डॉ. आत्राम यांच्या नियुक्तीचा फेरविचार करण्याच्या विनंतीबाबत उच्चशिक्षण विभागाकडून काहीच हालचाल न झाल्याने अखेर कुलसचिव पदाची सूत्रे डॉ. अत्राम यांच्याकडे सोपविण्यात आली. नव्या कुलसचिवांच्या नियुक्तीचे आदेश निघून पाच दिवस झाले असतानाही आदल्याच दिवशी कुलगुरूंनी उच्चशिक्षण विभागाला पत्र का लिहिले, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.

विद्यापीठाच्या कारभारात हस्तक्षेप?

कुलसचिवांच्या नियुक्तीची सर्व प्रक्रिया पूर्ण करून पूर्णवेळ नियुक्ती करण्याऐवजी एका वर्षासाठी नियुक्ती करणे योग्य नसल्याचे मत अधिकार मंडळाच्या सदस्यांनी व्यक्त केले आहे. विद्यापीठाच्या कारभारात शासनाचा अवाजवी हस्तक्षेप होत असल्याची टीकाही करण्यात येत आहे.

पत्रात काय? : ‘ डॉ. गायकवाड हे अत्यंत सक्षमपणे कुलसचिवपदाचा कार्यभार सांभाळत आहेत. विद्यापीठाचा ‘नॅक’चा अहवाल सादर करण्यासाठीही त्यांची मदत झाली आहे. कुलसचिव पद हे पाच वर्षांच्या कालावधीसाठी लवकरात लवकर भरण्यात यावे जेणेकरून विद्यापीठाला पूर्णवेळ कुलसचिव मिळतील. तरी डॉ. अत्राम यांच्या नियुक्तीचा फेरविचार करण्यात यावा’, अशी विनंती कुलगुरूंनी पत्रात केली होती.

नियुक्ती नाट्य… : डॉ. अत्राम यांना पदभार स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार ते शुक्रवारी पदभार स्वीकारण्यासाठी आले. मात्र विद्यापीठाने सायंकाळपर्यंत प्रक्रियाच पूर्ण केली नाही. अखेर सायंकाळी त्यांना पदभार देण्यात आला. पदभार स्वीकारू नये अशी विनंती कुलगुरूंनी डॉ. अत्राम यांना केली असल्याचे समजते. मात्र, नियमानुसार पदभार न स्वीकारल्यास नोंदपटावर सेवा खंडित झाल्याचे दिसेल, असे डॉ. अत्राम यांनी सांगितल्यावर अखेर सायंकाळी त्यांच्याकडे पदभार देण्यात आला.