रविवारची सुटी संपवून सोमवारी कामावर जाताना प्रतीक्षा असते ती सुटीची. यात जर सलग चार दिवस सुटी आली तर विचारायलाच नको. तीच बाब हेरून १५ ते १८ ऑगस्ट दरम्यान आलेल्या जोडून सुट्टय़ांनी पर्यटकांचे नंदनवन असलेल्या महाबळेश्वरला तब्बल २७ हजारांवर पर्यटकांनी भेट दिली. गेल्या आठ वर्षांत हे सर्वाधिक पर्यटक होते असे हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले.
स्वातंत्र्यदिनी पर्यटक मोठय़ा संख्येने बाहेर पडल्याने मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहनांच्या रांगा होत्या. मुंबईहून वाईला जाण्यासाठी चेंबूर येथे सकाळी आठच्या गाडीत बसलेल्या अशोक माने यांना वाईला पोहचण्यास सायंकाळी पाच वाजले. खरे तर ते दुपारी दोन-सव्वा दोनला पोहचणे अपेक्षित होते. हाच अनुभव अनेकांना आला. प्रामुख्याने मुंबई, पुण्याबरोबरच गुजरातमधूनच मोठय़ा संख्येने पर्यटकांनी महाबळेश्वरचा रस्ता धरला. त्यामुळे महाबळेश्वरसह वाई-पाचगणी परिसरातील हॉटेल्स फुल होती. अनेक पर्यटक महाबळेश्वरला हॉटेल्स महाग असतात म्हणून फिरून झाल्यावर मुक्कामासाठी वाईला पसंती देतात. मात्र वाईतही लॉजिंग फुल्ल झाल्याने त्यांची निराशा झाली.
अगदी महाबळेश्वर त्यापासून अर्धातास अंतरावर असलेले पाचगणी आणि तितक्याच अंतरावर असलेले वाई येथेही जागा मिळाली नाही म्हणून काही पर्यटकांनी सातारा आणि शिरवळ येथे राहाणे पसंत केले. खरे तर ही दोन्ही ठिकाणे महाबळेश्वरपासून दोन तासांच्या अंतरावर आहेत. तरीही जागा मिळेल तेथे पर्यटक राहिले. पावसाळ्यात महाबळेश्वरला रोज सरासरी एक ते दीड हजार पर्यटक येतात. मात्र हे प्रमाण आठ ते नऊ पट वाढल्याने महाबळेश्वर पालिकेच्या तिजोरीतही साडेपाच ते सहा लाखांची भर पडली असे महाबळेश्वरच्या पालिका अधिकाऱ्याने स्पष्ट केले. एका पर्यटकामागे २० रुपये पालिकेला मिळतात. चार दिवसांत वाई, महाबळेश्वर परिसरात हॉटेल आणि इतर व्यावसायिकांची कोटय़वधींची उलाढाल झाली.

पर्यटक सातारा, शिरवळकडे
वाईत लॉजिंगसाठी साधारणत: साध्या खोलीसाठी पंधराशे तर वातानुकूलित खोलीसाठी २३०० रुपये दर आकारला जातो. या दिवसांत दर दुप्पट झाला. मात्र वाढत्या गर्दीने सर्व हॉटेल्स फुल्ल झाली. काही जण कितीही पैसे घ्या खोली द्या, अशी विनंती करत होते. मात्र हॉटेल्स आधीच फुल्ल झाल्याने खोल्या देणे अशक्य झाले. मग हे पर्यटक सातारा आणि शिरवळकडे गेले.

गेल्या आठ वर्षांत प्रथमच इतक्या मोठय़ा संख्येने पर्यटक आले होते. त्यामुळे परिसरातील हॉटेल व्यावसायिकांची लाखोंची उलाढाल झाली. आगाऊ बुकिंन न केलेल्यांना परत पाठवावे लागले.
– विशाल चोरगे, हॉटेल व्यावसायिक, वाई.