गेल्या काही दिवसांपासून मुंबई विमानतळावर सोने तस्करीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे सीमाशुल्क विभागाने सोने तस्करी करणाऱ्यांविरोधात धडक मोहीमच उघडली असून गेल्या दोन दिवसांत या विभागाने तब्बल नऊ तस्करीच्या घटना उघडकीस आणल्या आहेत. या घटनांमधून आतापर्यंत तब्बल तीन कोटी ७० लाख रुपयांचे सोने ताब्यात घेतले आहे.
सोने तस्करीच्या घटनांमध्ये झालेली वाढ पाहता या सोने तस्करीच्या पडद्याखाली इतर काही हानीकारक वस्तूंची तस्करी होत आहे की काय, असा संशयही सुरक्षा अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. परिणामी आता मुंबई विमानतळावरील सुरक्षा तपासणी अधिक कडक करण्यात येणार आहे. सोन्याच्या तस्करीसाठी आंतरराष्ट्रीय तस्करांनी बहुधा मुंबईची निवड केली असावी. गेल्या पंधरवडय़ापासून मुंबई विमानतळावर दर दिवशी किमान एक ते दोन प्रवाशांना सोन्याची तस्करी करताना पकडण्यात येत आहे. शनिवारी विमानतळ सुरक्षा पथकाने सोने तस्करीच्या आठ प्रकरणांत १.८ कोटी रुपयांचे सोने जप्त केले होते. या वेळी सुरक्षा विभागाचे अतिरिक्त आयुक्त मिलिंद लांजेवार यांनी हा एक विक्रम असल्याचे सांगितले होते. मात्र दुसऱ्याच दिवशी, रविवारी हा विक्रम मोडीत काढण्यात आला. एका दिवसात तब्बल नऊ प्रकरणांचा छडा लावण्यात सीमा शुल्क विभागाला यश आले आहे. मुंबई विमानतळावरील सुरक्षा व्यवस्था अधिक कठोर करण्यात येणार असल्याची माहिती एका
अधिकाऱ्याने दिली.