पोलीस दलात अस्वस्थता निर्माण केल्याबद्दल नोंद गुन्ह्य़ात ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी रिपब्लिक वृत्तवाहिनीच्या चार प्रतिनिधींचे जबाब नोंदविले. तसेच या प्रतिनिधींनी दिलेले तपशील तपासून जबाबदारी निश्चित करण्यासाठी रिपब्लिक वाहिनीकडे गुरुवारी आवश्यक माहितीची मागणी केली.

‘मुंबई पोलीस दलात दोन गट पडले असून, त्यापैकी एक गट पोलीस आयुक्त परमबिर सिंग यांच्याविरोधात आहे. हा गट बंड करण्याच्या पावित्र्यात आहे’, अशी माहिती रिपब्लिक वाहिनीने २२ ऑक्टोबरला प्रसिद्ध केली होती. पोलीस दलात अस्वस्थता निर्माण करण्यासाठी, पोलीस दलाची बदनामी करण्यासाठी रिपब्लिक वाहिनीने हेतुपुरस्सर या निराधार माहितीआधारे वृत्त दिले, असा दावा करत पोलिसांनी रिपब्लिक वाहिनीविरोधात गुन्हा नोंदवला.

या गुन्ह्य़ाच्या तपासासाठी पोलिसांनी सागरिका मित्रा, शिवानी गुप्ता, निरंजन नारायणस्वामी, शावन सेन या चार प्रतिनिधींचे जबाब नोंदवले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, रिपब्लिक वाहिनीत वरिष्ठ सहायक संपादकपदी कार्यरत गुप्ता यांनी जबाबात आऊटपूट डेस्क इन्चार्ज, आऊटपूट डेस्कद्वारे प्राप्त मजकूर वाचून दाखवला, असा दावा केला. हा दावा आणि अन्य तीन प्रतिनिधींनी जबाबात सांगितलेला तपशील पडताळण्यासाठी रिपब्लिक वाहिनीला फौजदारी दंड संहितेतील कलम ९१द्वारे प्राप्त अधिकारांत तपास अधिकाऱ्याने नोटीस बजावून तपासाच्या अनुषंगाने आवश्यक माहिती मागितली आहे. मात्र अद्याप वाहिनीकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.

टीआरपी घोटाळ्याप्रकरणी आरोपीच्या कंपनीत तपास

* टीआरपी घोटाळ्याप्रकरणी अटक आरोपी आशीष चौधरी याच्या ‘क्रिस्टल ब्रॉडकास्ट’ कंपनीच्या कार्यालयासह सात ठिकाणी विशेष पथकाने शोधाशोध करून तपासाशी संबंधित कागदपत्रे, उपकरणे हस्तगत केल्याचा दावा शुक्रवारी गुन्हे शाखेने केला.

* क्रिस्टल कंपनीत आशीषची पत्नी आणि अन्य एक व्यक्ती संचालक पदी आहेत. मात्र कंपनीचे सर्व व्यवहार आशीष हाताळतो, असेही गुन्हे शाखेकडून सांगण्यात आले. मुंबई, ठाण्यातील कंपनीची कार्यालये, कंपनीशी संबंधित व्यक्तींच्या निवासस्थानांवर ही कारवाई करण्यात आली.