माध्यमिकच्या तुकडय़ांची फेररचना करण्याचा सरकारचा निर्णय शिक्षकांची कत्तल करणारा असून तो मागे न घेतल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा शिक्षक परिषदेचे अध्यक्ष रामनाथ मोते यांनी दिला आहे. या निर्णयामुळे हजारो शिक्षक अतिरिक्त ठरणार असून त्यामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील अनुदानित आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील तुकडय़ांची फेररचना करण्याचा निर्णय सरकारने गुरुवारी घेतला. त्यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. पटपडताळणीच्या माध्यमातून शाळा बंद करण्याचा आणि सुशिक्षित बेरोजगारी वाढविण्याचा सरकारचा प्रयत्न उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे फुसका बार ठरला. त्यामुळे शिक्षण विभागातील चांडाळ चौकडीने तुकडय़ांच्या फेररचनेचा नवीन फंडा शोधून काढल्याची टीका मोते यांनी केली आहे. मराठी माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असल्याने तुकडय़ा टिकविण्यासाठी तत्कालीन शिक्षणमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी जाणीवपूर्वक तुकडय़ांमधील विद्यार्थी संख्या शहरी भागासाठी २५, ग्रामीण भागासाठी २० आणि नक्षलवादी, आदिवासी भागासाठी १५ ठेवली होती. आता जून २०१३ पासून पूर्वलक्ष्यी प्रभावाने हा निर्णय लागू करण्यात आल्याने शिक्षकांमध्ये संतापाचा उद्रेक झाला आहे. मुंबईत शेकडो तुकडय़ा बंद होऊन हजारो शिक्षकांना मुंबईबाहेर पाठवावे लागेल. हे हाणून पाडण्याचा इशारा परिषदेचे मुंबई संघटन मंत्री अनिल बोरनारे यांनी दिला आहे.