प्रवेश परीक्षेनंतर दोन वर्षांनी आणि ‘पवित्र’ प्रणालीतील गोंधळांनंतर आता प्रत्यक्षात शिक्षक भरती सुरू झाली असली तरी सुरू असलेल्या घोळांमुळे उमेदवारांवरील टांगती तलवार अद्यापही दूर झालेली नाही. माध्यम, शाळांचे पर्याय याबाबत अजूनही गोंधळ असल्याची तक्रार उमेदवारांनी केली आहे. त्याचप्रमाणे मुंबई महापालिकेच्या शाळांमधील भरतीसाठी शालेय शिक्षणही इंग्रजी माध्यमातून असले पाहिजे, अशी अट आयत्यावेळी घालण्यात आल्यामुळे अनेक उमेदवारांना संधी गमावावी लागणार आहे.

‘पवित्र’ प्रणालीच्या माध्यमातून दोन वर्षे राज्यात शिक्षण भरतीची प्रक्रिया सुरू आहे. दोन वर्षे सतत येणाऱ्या अडचणी, अनेकदा नव्याने भरावे लागलेले अर्ज अशा मनस्तापानंतर अखेर भरतीची प्रक्रिया सुरू झाली. पात्र उमेदवारांच्या याद्या जाहीर करून मुलाखतीशिवाय भरती करण्याच्या प्रक्रियेत उमेदवारांचे समुपदेशन सुरू करण्यात येत आहे. मुंबई महापालिकेच्या शाळांसाठी अर्ज केलेल्या अनेक उमेदवारांना आयत्यावेळी बदलण्यात आलेल्या अटींमुळे संधी गमावण्याची वेळ आली आहे.

महापालिकेच्या माध्यमिक शाळेतील काही पदांचे पर्याय देताना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या जाहिरातीत शिक्षणशास्त्रातील पदवी (बीएड, एमएड) इंग्रजी माध्यमातून असावी अशी अट देण्यात आली होती. दोन वर्षांनंतर आता प्रत्यक्ष भरती सुरू झाली तेव्हा शिक्षणशास्त्रातील पदवीबरोबरच शालेय स्तरापासून पदवीचेही शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालेले असावे अशी अट घालण्यात आली आहे. उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर अचानकपणे वेगळा नियम लागू करण्यात आल्यामुळे शेकडो उमेदवारांना संधी गमवावी लागणार असल्याची तक्रार उमेदवारांनी केली आहे. त्याचप्रमाणे महापालिकेच्या शाळा वगळून ज्या उमेदवारांनी इतर शासकीय शाळांचा पर्याय निवडला आहे त्यांचाही मनस्ताप चुकलेला नाही. ज्या उमेदवारांनी मराठी माध्यमाच्या शाळेत शिकवण्याची इच्छा व्यक्त केली आहे त्यांना मराठी माध्यमाच्या शाळांचे पर्यायच उपलब्ध झालेले नाहीत. मराठी माध्यमाच्या शाळांचे एक किंवा दोन पर्याय उमेदवारांना मिळत आहेत. मात्र, इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे दहा-बारा पर्याय उमेदवारांसमोर येतात. त्यामुळे भरती सुरू झाली तरी घोळ कायम आहेत.