आठ हजार तरुणांना लाभ; मंत्री रावते यांची माहिती

परभणी : महाराष्ट्रात १७५ ठिकाणी अत्याधुनिक बसस्थानक उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. दुष्काळग्रस्त भागातील युवकांना रोजगार देण्याच्या दृष्टीने एसटी महामंडळात भरती प्रक्रिया सुरू केली असून आठ हजार तरुणांना याचा लाभ होणार आहे, अशी माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी येथे दिली.

येथील नवीन बसपोर्टच्या कामाचे भूमिपूजन बुधवारी रावते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार डॉ. राहुल पाटील, आ. बाबाजानी दुर्राणी, जिल्हाधिकारी पी.शिवाशंकर, महापौर मिनाताई वरपूडकर, मनपा आयुक्त रमेश पवार, उपविभागीय अधिकारी सुचेता िशदे, तहसीलदार विद्याचरण कडावकर, डॉ.विवेक नावंदर, गजानन काकडे यांची उपस्थिती होती.

रावते म्हणाले, राज्य परिवहन महामंडळात चालक म्हणून १६२ मुलींना माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पुणे येथील कार्यक्रमात नियुक्तिपत्र देण्यात येणार आहे. वयाच्या ५५ वर्षांंनंतर सेवानिवृत्त होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या सर्व लाभासह दहा लाख रुपये देण्यात येतील. महामंडळाच्या ३३ हजार कर्मचाऱ्यांच्या मुलांना ७५० रुपये पॉकिटमनी देण्यात येत आहे. तर उच्च शिक्षणासाठी कर्मवीर भाऊराव पाटील कर्ज योजनेद्वारे बिनव्याजी कर्ज पुरवठा करण्यात येत आहे. प्रवाशी आपला अन्नदाता असून टिकेतून मार्ग काढीत यशाच्या दिशेने वाटचाल करण्याचे आवाहन रावते यांनी केले.  यावेळी आ.डॉ.पाटील म्हणाले, परभणी विधानसभा मतदारसंघात सांस्कृतिक, कृषी, शैक्षणिक अशा चौफेर विकासाचे प्रयत्न सुरू आहेत. िपगळगड नाला पुनरुज्जीवनानंतर सौर ऊर्जेवर चालणारी पहिली महिला सूतगिरणी उभारण्यात येणार आहे. आज भूमिपूजन झालेले संपूर्ण बसपोर्ट अत्याधुनिक सुविधांसह वातानुकूलीत राहणार असल्याचे आमदार डॉ. पाटील म्हणाले.

यावेळी आमदार दुर्राणी, महापौर श्रीमती वरपूडकर यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक विभाग नियंत्रक मुक्तेश्वर जोशी यांनी केले. कार्यक्रमास गंगाप्रसाद आणेराव, अनिल डहाळे, नगरसेवक प्रशास ठाकूर, नंदू आवचार, राम खराबे पाटील आदींची उपस्थिती होती.

खासदारांची अनुपस्थिती

आजच्या बसपोर्ट भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला काही लोकप्रतिनिधींची अनुपस्थिती होती. तरीही खासदार संजय जाधव यांची अनुपस्थिती मात्र प्रकर्षांने जाणवत होती. खासदार विरुद्ध आमदार यांच्यातील संघर्ष अजूनही थांबला नसल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले.