पुरुषांसाठी १.६ किमी तर महिलांसाठी ८०० मीटर

राज्य पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून भरती होणाऱ्या उमेदवारांच्या घेण्यात येणाऱ्या शारीरिक क्षमता चाचणीत कपात करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यामुळे आता या भरतीत सहभागी होणाऱ्या पुरुष उमेदवारांना १.६ किलोमीटर तर महिला उमेदवाराला फक्त ८०० मीटर इतके अंतर धावावे लागणार आहे. याशिवाय लेखी परीक्षा एकाच वेळी राज्यभरात घेतली जाणार आहे. गेल्या दोन वर्षांत पोलीस भरतीत पाच जणांचा मृत्यू झाल्यानंतर याबाबत सतर्क झालेल्या राज्य शासनाने हा निर्णय घेतला असून लवकरच तशी अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. याशिवाय थंडीच्या मोसमात भरती घेण्याबाबत केलेली विनंती मात्र फेटाळण्यात आली आहे.
राज्य पोलीस दलातील भरती आयुक्तालय, अधीक्षक कार्यालयांकडून केली जाते. एकाच वेळी होणाऱ्या या भरतीत शारीरिक चाचणीअंतर्गत धावण्याची चाचणी घेतली जाते. पुरुष उमेदवारांनी पाच किलोमीटर तर महिला उमेदवारांनी तीन किलोमीटपर्यंतचे अंतर कापणे आवश्यक असते. उन्हाळ्यात भरती होत असल्यामुळे राज्यातून आलेले अनेक उमेदवार ही चाचणी पूर्ण करण्यात अपयशी ठरतात. गेल्या दोन वर्षांत शारीरिक चाचणीची ही प्रमुख अट पूर्ण करताना पाच जणांचे मृत्यू झाले. त्यामुळे राज्य शासनावर टीका झाली. हे अंतर कमी करावे, भरती थंडीच्या मोसमात घ्यावी आदी मागण्या करण्यात आल्या होत्या. या पाश्र्वभूमीवर शासनाने प्रस्तावित केले आहे. मुंबई, ठाण्यासारख्या पोलीस आयुक्तालयात लाखाहून अधिक अर्ज येतात. या अर्जाची तपासणी करण्यात बराचा कालावधी जातो. त्यामुळे थंडीच्या मोसमात शारीरिक चाचणी घेण्याची मागणी शक्य नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
शासनाने असे प्रस्तावित केले असले तरी भरतीसाठी धावण्याची मर्यादा कमी करण्याच्या प्रस्तावीत अधिसूचनेबद्दल एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने आक्षेप घेतला आहे. पोलीस दलात शिपाई म्हणून भरती होणारे उमेदवार हे शारीरिकदृष्टय़ा तंदुरुस्त असलेच पाहिजेच. पुरुषांसाठी पाच तर महिलांसाठी तीन किलोमीटर हे अंतर अधिक नाही. वैद्यकीय चाचणी घेऊन उमेदवारांना ही चाचणी देता येईल. जे शारीरिकदृष्टय़ा तंदुरुस्त असतील अशाच उमेदवारांना पाच वा तीन किलोमीटर धावणे बंधनकारक करावे. शिपाई म्हणून भरती होणाऱ्याला गस्त घालावी लागते.
अशा वेळी त्याची शारीरिक चाचणी महत्त्वाची आहे, याकडेही या अधिकाऱ्याने लक्ष वेधले. लेखी परीक्षा एकाच वेळी आणि त्याच दिवशी घेण्याच्या प्रस्तावित सूचनेचे या अधिकाऱ्याने स्वागत केले आहे. त्यामुळे एकाच उमेदवाराला अनेक ठिकाणी अर्ज करण्यापासून रोखता येईल आणि गुणवान उमेदवारांना संधी मिळेल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.