राज्याच्या पोलीस दलात शिपाई पदावर दहा हजार  तरुणांची भरती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंगळवारी राज्य सरकारने घेतला. त्याचप्रमाणे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मतदारसंघात काटोल येथे राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) महिला तुकडीची स्थापना करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. या महाभरतीचा फायदा फायदा शहरी व ग्रामीण तरुणांना होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत गृह विभागाकडून पोलीस शिपाई पदाच्या आठ हजार जागा भरण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता; परंतु करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांवर पडणारा ताण आणि वाढीव कर्मचाऱ्यांची गरज लक्षात घेऊन उपमुख्यमंत्र्यांनी आणखी दोन हजार जागा वाढवून एकूण १० हजार पोलीस शिपायांची भरती करण्याचे आणि ही भरती प्रक्रिया येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचे आदेश दिले. करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया  कशी राबवता येईल, याचा विचार करून र्सवकष प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत तातडीने मांडण्याचे आदेशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले.  १० हजार पोलीस शिपायांची भरती करण्याबरोबरच नागपूरच्या काटोल येथे राज्य राखीव पोलीस दलाची (एसआरपीएफ) महिला तुकडी (बटालियन) स्थापन करण्याच्या निर्णयावरही  शिक्कामोर्तब करण्यात आले. या बटालियनसाठी १३८४ पदे निर्माण करण्यात येणार असून प्रत्येक टप्प्यात ४६१ प्रमाणे तीन टप्प्यांत ही पदे भरण्यात येणार आहेत. यातूनही शहरी व ग्रामीण युवतींना पोलीस सेवेची संधी मिळणार असल्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

खास महिला तुकडी

राज्यातील सण, उत्सव, सामाजिक-राजकीय मोर्चामध्ये महिलांची लक्षणीय संख्या लक्षात घेऊन कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी राज्य राखीव पोलीस दलाची  महिला तुकडी स्थापना करण्यात येणार आहे. उपराजधानी नागपूरची भौगोलिक स्थिती, रेल्वे, विमान व दळणवळणाच्या साधनांची उपलब्धता लक्षात घेऊन एसआरपीएफच्या या केंद्रासाठी नागपूर जिल्ह्य़ाची शिफारस करण्यात आली होती. त्याअनुषंगाने काटोल गावच्या हद्दीत शासकीय जमीन उपलब्ध असल्याने त्या ठिकाणी ही तुकडी स्थापन करण्यात येणार आहे, असे सरकारतर्फे सांगण्यात आले.