|| प्रसाद रावकर

पुनर्वापर शक्य झाल्याने कचरा वेचकांचा वेष्टने गोळा करण्याकडे कल

दूध, फळांचे रस, शीतपेये, सरबते प्यायल्यानंतर कचराभूमीवर जाणाऱ्या टेट्रापॅकचा पुनर्वापर करणे शक्य झाले आहे. अ‍ॅल्युमिनिअम, कागद आणि प्लास्टिकच्या मिश्रणातून तयार केलेल्या या वेष्टनांपासून आता टेबल, खुच्र्या, छत तयार केले जाऊ लागले आहे. ही वेष्टने गोळा केल्यामुळे पदरी चार पैसे पडू लागल्याने कचरावेचकही टेट्रा पॅक गोळा करू लागले आहेत.

विविध द्रव पदार्थ टेट्रा पॅकमधून विकले जातात. त्यामुळे कचऱ्यातील या वेष्टनांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. पूर्वी ते थेट कचराभूमीत पोहोचत होते. विघटनही होत नसल्यामुळे ही वेष्टने पालिकेसाठी डोकेदुखी ठरली होती.

टेट्रा पॅकचा वाढता कचरा लक्षात घेऊन पालघरस्थित एका कंपनीने त्यांच्या पुनर्वापरासाठी प्रयत्न सुरू केले आणि त्यापासून टेबल, खुच्र्या, छप्पर आदींची निर्मिती शक्य असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मात्र ठिकठिकाणी कचऱ्यात टाकलेले टेट्रा पॅक गोळा करण्याचे मोठे आव्हान कंपनीसमोर होते. मुंबईत कचऱ्यात टाकलेले टेट्रा पॅक गोळा करून कंपनीपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘संपूर्ण अर्थ एन्व्हायर्नमेंट सोल्यूशन’ या कंपनीने केले. राज्यात प्लास्टिकबंदी लागू झाल्यानंतर टेट्रा पॅकमधून दूध, सरबत, फळांच्या रसांची विक्री करणाऱ्या एका कंपनीनेही या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले. या कंपनीनेही ‘संपूर्ण अर्थ एन्व्हायर्नमेंट सोल्यूशन’च्या मदतीने कचऱ्यातील टेट्रा पॅक गोळा करण्याची मोहीम हाती घेतली.

‘संपूर्ण’कडून टेट्रा पॅक गोळा केले जातात. ते चपटे करून, चळत करून पालघर येथील कंपनीकडे पुनर्वापरासाठी पाठविण्यात येतात. गेली सहा वर्षे ‘संपूर्ण’ने चळवळ म्हणून ही मोहीम हाती घेतली आहे. महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी लागू झाल्यापासून आतापर्यंत ‘संपूर्ण’ने तब्बल ४० मेट्रिक टन टेट्रा पॅक पुनर्वापरासाठी पाठविले आहेत.

कचऱ्यातील प्रत्येक घटकाचा पुनर्वापर करता येऊ शकतो, असे ‘संपूर्ण’च्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आता बिस्किटच्या वेष्टनांचा पुनर्वापर व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ते इंधन म्हणून सीमेंट कंपन्यांना पाठविण्यास त्यांनी सुरुवात केली आहे.

कचऱ्याच्या ढिगातून पैसे मिळतील असेच घटक वेगळे करण्यात येतात. आता टेट्रा पॅक गोळा केल्यावर पैसे मिळू लागले आहेत. त्यामुळे कचरा वेचकही टेट्रा पॅक गोळा करू लागले आहेत. संस्थेच्या कचरा वर्गीकरण केंद्रात येणाऱ्या कचऱ्यातूनही टेट्रा पॅक वेगळे केले जातात. टेट्रा पॅकपासून टेबल, खुर्ची, छतासाठी पत्रे, कचराकुंडी आदी वस्तू बनविण्यात येत आहेत. त्यामुळे भविष्यात कचऱ्यातून ते नाहीसे होतील.    देबार्थ बॅनर्जी, संचालक, संपूर्ण अर्थ एन्व्हायर्नमेंट सोल्यूशन