महसूल गुप्तचर यंत्रणेच्या सर्तकतेमुळे रक्तचंदनाच्या लाकडाच्या तस्करीचा कट उधळून लावण्यात तपास यंत्रणांना यश आले आहे. उरण न्हावा-शेवा येथे बुधवारी रक्तचंदनाच्या लाकडांनी भरलेला कंटेनर पकडण्यात आला. न्हावा-शेवा बंदरामार्गे ही लाकडे मलेशियाला पाठवण्याची योजना होती. निर्यात कागदपत्रांमध्ये पॉलिएस्टर धाग्याची ६४८ बंडले असल्याचे सांगण्यात आले होते.

पण प्रत्यक्षात मालाची तपासणी केली तेव्हा ९०४० किलो वजनाची रक्तचंदनाची लाकडे सापडली. कोणालाही तस्करीचा संशय येऊ नये यासाठी तांदळांनी भरलेल्या पिशव्यांमध्ये ही लाकडे लपवून ठेवण्यात आली होती. रक्तचंदनाची लाकडे आंध्र प्रदेशच्या जंगलात सापडतात.

९०४० किलो वजनाच्या रक्तचंदनाचे आंतरराष्ट्रीय बाजारातील मुल्य चार कोटी ५२ लाख रुपये आहे. कस्टम कायद्याच्या कलम १०४ अंतर्गत या तस्करी प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. पूर्व आशियाई देशांमध्ये चीन आणि जापानमध्ये रक्तचंदनाच्या लाकडाला भरपूर मागणी आहे. फर्निचर आणि औषध बनवण्यासाठी रक्तचंदनाच्या लाकडाचा उपयोग होतो.