मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह इतर रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. गृह विभागाने या संबंधीचा आदेश मंगळवारी जारी केला आहे.

भारतीय रेल्वे स्थानक विकास महामंडळांमार्फत संपूर्ण देशातील सध्या अस्तित्वात असलेल्या रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्याची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेण्यात आली आहे. या योजनेत महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, अंधेरी, लोकमान्य टिळक टर्मिनस इत्यादी रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या धर्तीवर मुंबई महानगरातील रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्याची महामंडळाने राज्य सरकारला विनंती के ली होती. त्यानुसार ही समिती स्थापन करण्यात आली आहे.

मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील या उच्चस्तरीय समितीत अप्पर मुख्य सचिव (गृह), अप्पर मुख्य सचिव (महसूल), अप्पर मुख्य सचिव (परिवहन), प्रधान सचिव (नगरविकास), मुंबई महापालिका आयुक्त, मुंबई पोलीस आयुक्त, मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचे आयुक्त, भारतीय रेल्वे स्थानक पुनर्विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक,  मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष व पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक हे सदस्य असतील. तर मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे समितीच्या सदस्य सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.