03 March 2021

News Flash

नाटय़गृहांचे भाडे कमी करा!

अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेची मागणी

(संग्रहित छायाचित्र)

व्यावसायिक, प्रायोगिक, हौशी आणि बाल अशा सर्व प्रकारच्या नाटकांसाठी येत्या २०२१ या वर्षांत नाटय़गृहाचे भाडे कमी करण्याची मागणी राज्य सरकारकडे करणार असल्याचे अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेकडून सांगण्यात आले.

टाळेबंदीकाळात नाटय़ व्यवसायाचे ७५ टक्के नुकसान झाले आहे. या व्यवसायावर २५ हजार लोक अवलंबून आहेत. त्यामुळे सरकारने या व्यवसायाला आर्थिक आधार देण्याची अपेक्षा परिषदेकडून व्यक्त करण्यात आली. माटुंग्याच्या यशवंतराव चव्हाण नाटय़संकुलात नुकतीच अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेची पत्रकार परिषद पार पडली. जानेवारी ते डिसेंबर २०२१ या कालावधीसाठी व्यावसायिक नाटकांसाठी नाटय़गृहांचे भाडे ५ हजार रुपये आणि प्रायोगिक, हौशी, बाल नाटय़ांसाठी दोन हजार रुपये भाडे असावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

२०२१ या वर्षांत नाटय़गृहांची वीज देयके आणि मालमत्ता कर माफ करावेत, तसेच रंगमंच कामगार, तंत्रज्ञ आदींना रेल्वे प्रवासाची मुभा द्यावी, मदत म्हणून सरकारने १० कोटी रुपयांचा निधी द्यावा आणि अनुदान धोरणावर फेरविचार करून ते अधिक व्यापक करावे, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

नाटय़गृहे उघडण्याबाबत शासनाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांबाबत नाटय़ परिषदेने काही आक्षेप नोंदवले आहेत. या तत्त्वांच्या आधारे नाटय़प्रयोग शक्य आहेत का, हे तपासण्यासाठी सरकारने प्रायोगिक तत्त्वावर एखादा प्रयोग करून पाहावा व याच आधारे सरकारी नाटय़गृहे सुरू करावीत, अशी सूचनाही करण्यात आली.

मार्गदर्शक तत्त्वांबाबत आक्षेप..

* निर्जंतुकीकरण, रंगभूषाकारांना पीपीई किट आदींचा खर्च नाटय़गृह व्यवस्थापनाने उचलावा की निर्मात्याने?

* एखाद्या कलाकाराची प्राणवायू पातळी ऑक्सिमीटरमध्ये थोडीफार कमी दिसली तर आयत्या वेळी प्रयोग रद्द करावा लागेल. त्याचे नुकसान कोण सोसणार?

* प्रसाधनगृहांसारख्या ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी दीर्घकाळाचे मध्यंतर ठेवावे, म्हणजे नेमके किती काळाचे?

* ५० टक्के प्रेक्षक बसवल्यास उरलेल्या ५० टक्के नुकसानाची भरपाई कोण देणार?

* अंतर ठेवून बसवल्यानंतरही नाटक सुरू झाल्यावर प्रेक्षक नियम पाळतात का, यावर नियंत्रण कसे ठेवणार?

* नियम न पाळल्यास संबंधितांवर म्हणजे नेमकी कोणावर कारवाई होणार?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 16, 2020 12:20 am

Web Title: reduce theater rents demand for all india marathi drama council abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 अकरावी प्रवेशाचा पेच कायम
2 करोनाकाळातही दिवाळी अंकांना मोठा प्रतिसाद; मागणी वाढल्याने पुन्हा छपाई
3 शिवाजी पार्कमध्ये सर्वाधिक ‘आवाज’
Just Now!
X