नवीन शैक्षणिक वर्षांपासून अंमलबजावणी; मात्र दरवर्षी ५ टक्के शुल्कवाढीलाही मंजुरी

प्राध्यापकांचे परीक्षेच्या कामाचे वाढलेले मानधन देण्यासाठी वाढवलेले परीक्षा शुल्क मुंबई विद्यापीठाने अखेर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. १० ते ८० टक्के कपात करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला असून पुढील शैक्षणिक वर्षांपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. एकीकडे परीक्षा शुल्क कमी करतानाच दरवर्षी शुल्कात पाच टक्के वाढ करण्याचा निर्णयही विद्यापीठाने घेतला आहे.

विद्यापीठाने प्राध्यापकांच्या मानधनात २००१ मध्ये सुधारणा केली. मात्र त्यानंतरही विद्यापीठाकडून १९९६ च्या रचनेप्रमाणे शुल्क आकारण्यात येत होते. परीक्षेच्या कामाच्या वाढलेल्या खर्चाचा विचार करून गेल्यावर्षी (२०१६-१७) विद्यापीठाने परीक्षा शुल्कात वाढ केली. मात्र, शुल्क कमी करण्याबाबत विविध संघटनांकडून विद्यापीठाला सातत्याने निवेदने देण्यात येत होती. त्या अनुषंगाने शुल्काचा फेरविचार करण्याचा प्रस्ताव अधिष्ठाता मंडळाकडे देण्यात आला होता. मंडळाच्या शिफारशीनुसार अखेर शुल्कात कपात करण्याचा निर्णय विद्वत परिषद आणि व्यवस्थापन परिषदेने घेतला आहे. साधारण १० ते ८० टक्क्यांपर्यंत विषयनिहाय शुल्क विद्यापीठाने कमी केले आहे.

विद्यार्थ्यांना एका विषयाची परीक्षा द्यायची असो किंवा सर्व विषयांची, पदवी अभ्यासक्रमासाठी एक हजार रुपये आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी पंधराशे रुपये शुल्क आकारण्यात येत होते. आता मात्र सरसकट शुल्क न भरता विषयसंख्येनुसार विद्यार्थ्यांना शुल्क भरावे लागेल. पदवी अभ्यासक्रमाच्या एका विषयाच्या परीक्षेसाठी २०० रुपये, दोन विषयांच्या परीक्षेसाठी ४०० रुपये आणि तीन किंवा अधिक विषयांच्या परीक्षेसाठी ९०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या एका विषयासाठी ४०० रुपये, दोन विषयांसाठी ७०० रुपये आणि तीन किंवा त्यापेक्षा अधिक विषयांसाठी तेराशे पन्नास रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

शुल्कात मोठय़ा प्रमाणावर कपात करताना दरवर्षी पाच टक्क्यांनी परीक्षा शुल्कात वाढ करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. नव्याने निश्चित केलेले शुल्क मूलभूत मानून वाढ करण्यात येईल. नवे परीक्षा शुल्क पुढील शैक्षणिक वर्षांपासून म्हणजे २०१८ पासून लागू करण्यात येणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी लीलाधर बनसोड यांनी दिली.