व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांना यंदा शुल्कवाढ न देण्याबरोबरच पदवीच्या नव्या महाविद्यालयांसाठी निश्चित केलेले तात्पुरते शुल्क (अ‍ॅडहॉक) गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी करण्यात आले आहे.

राज्याचे शुल्क नियमन प्राधिकरण सर्व व्यवसायिक अभ्यासक्रमांचे शुल्क निश्चित करते. महाविद्यालयाच्या आदल्या वर्षीच्या खर्चाच्या अनुषंगाने शुल्क निश्चित करण्यात येते. नव्याने सुरू झालेल्या महाविद्यालयाला खर्चाचा निकष लावता येत नाही. त्यामुळे एकूण बाजारपेठ, खर्च यांच्या सरासरीनुसार प्राधिकरण शुल्क निश्चित करते. महाविद्यालयाला शुल्क वाढवून हवे असल्यास दोन वर्षांनंतर महाविद्यालय झालेल्या खर्चानुसार प्रस्ताव सादर करून शुल्क वाढवण्याची मागणी करू शकते. यंदा एकूण आर्थिक स्थिती, मंदी लक्षात घेऊन नव्या महाविद्यालयांचे तात्कालिक शुल्क प्राधिकरणाने कमी केले. विशेषत: वैद्यकीय आणि विधि महाविद्यालयांचे शुल्क कमी झाले आहे.

वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाचे तात्कालिक शुल्क ७ लाख २५ हजार रुपये प्रतिवर्ष असे निश्चित करण्यात आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ५० हजार रुपयांनी शुल्क कमी करण्यात आले आहे. गेल्या वर्षी तात्कालिक शुल्क ७ लाख ७५ हजार होते. दंतवैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाचे शुल्क २५ हजार रुपयांनी कमी झाले असून यंदा तात्कालिक शुल्क २ लाख ७५ हजार रुपये प्रतिवर्ष असे आहे. बीएएमएस, बीएचएमएस यांसह वैद्यकीयपूरक अभ्यासक्रम, परिचर्या अभ्यासक्रमाचे शुल्क गेल्या वर्षी इतकेच निश्चित करण्यात आले. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या शुल्कात मात्र ५० ते ७५ हजार रुपये वाढ करण्यात आली आहे. विधि अभ्यासक्रमाचे शुल्क गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन हजार रुपयांनी कमी झाले असून यंदा २५ हजार रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे.

औषधनिर्माणशास्त्र, वास्तुकला, अभियांत्रिकी यांसह विविध तांत्रिक अभ्यासक्रमांचे शुल्क गेल्या वर्षीप्रमाणेच ठेवण्यात आले आहे.