निशांत सरवणकर

करोनामुळे आर्थिक संकटात असलेल्या बांधकाम उद्योगाला संजीवनी देण्यासाठी राज्य सरकारने चटईक्षेत्रफळावरील प्रीमिअममध्ये आणखी १० ते १५ टक्के कपात करण्याचे ठरविले आहे. येत्या काही दिवसांत याबाबत अंतिम निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.

करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा बांधकाम उद्योगाला मोठा फटका बसल्याचे एचडीएफएसचे अध्यक्ष दीपक पारिख समितीनेही मान्य केले असून चटईक्षेत्रफळावर लागू करण्यात आलेल्या प्रीमिअममध्ये ५० टक्के कपात करण्याचे तसेच शीघ्रगणकाचे (रेडीरेकनर) दरही कमी करण्याचे त्यांनी सुचविले आहे.

देवेंद्र फडणवीस सरकारने अतिरिक्त चटईक्षेत्रफळावरील प्रीमिअममध्ये दोन वर्षांसाठी दहा टक्के कपात केली होती. त्यात आणखी कपात करण्याबरोबरच फंजिबल चटईक्षेत्रफळासाठी लागू करण्यात आलेला प्रीमिअमही कमी करण्याचे विद्यमान सरकारचे धोरण असल्याचे कळते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे हे अनुकूल असल्याचे या घडामोडींशी संबंधित असलेल्या सूत्रांनी सांगितले.

राज्य शासनाने मुद्रांक शुल्कात कपात केल्यामुळे घर खरेदीत वाढ होईल तसेच प्रीमिअम कमी करण्यात आला तर त्याचाही फायदा मोठय़ा प्रमाणात होऊन बांधकाम उद्योगात रोकडसुलभता निर्माण होईल, असा दावा केला जात आहे. पारिख यांच्या म्हणण्यानुसार, अशी कपात केली तर विकासकांना बांधकाम करणे परवडणारे आहे. म्हाडा तसेच पालिकेने याआधीच विकासकांना प्रीमिअम भरण्यासाठी सवलत दिली आहे. सुरुवातीला २० टक्के प्रीमिअम भरून निवासयोग्य प्रमाणपत्र घेण्याआधी उर्वरित ८० टक्के रक्कम भरण्याची मुभा दिली आहे. त्यासाठी त्यांना विक्री करावयाची घरे गहाण ठेवावी लागणार आहेत. यात आणखी कपात झाली तर त्याचा फायदा बांधकाम उद्योगाला मिळणार आहे.

अतिरिक्त चटईक्षेत्रफळ देण्याचा विचार..

चटईक्षेत्रफळ वापरावरील मर्यादाही उठवून विद्यमान चटईक्षेत्रफळावर ६० टक्क्यांपर्यंत अतिरिक्त चटईक्षेत्रफळ देण्याचा विचार आहे. त्यासाठी समूह पुनर्विकास किंवा एकात्मिक वसाहतीसाठी विकासकांना प्रवृत्त करून जादा चटईक्षेत्रफळ उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही या सूत्रांनी सांगितले. फडणवीस सरकारने मार्च २०१८ मध्ये विकास नियंत्रण नियमावलीचा मसुदा जारी केला. मात्र याबाबत काही निर्णय बाकी असून त्यात अतिरिक्त चटईक्षेत्रफळ उपलब्ध करून दिले जाण्याची शक्यता असल्याचेही या सूत्रांनी स्पष्ट केले.

चटईक्षेत्रफळ म्हणजे..

* चटईक्षेत्रफळ म्हणजे भूखंडावर किती आकाराचे बांधकाम करता येऊ शकते? (उदा. हजार चौरस फुटांच्या भूखंडावर एक चटईक्षेत्रफळ म्हणजे हजार चौरस फूट बांधकाम, तर दोन चटईक्षेत्रफळ म्हणजे दोन हजार चौरस फूट बांधकाम करता येऊ शकते.)

* फंजिबल चटईक्षेत्रफळ म्हणजे जिना, लिफ्ट, पॅसेज, ड्राय एरिया, लॉबी आदींसाठी वापरले जाणारे चटईक्षेत्रफळ.