रत्नागिरी जिल्ह्यातील प्रस्तावित रिफायनरीला शिवसेना, माजी मंत्री नारायण राणे आणि स्थानिकांचा विरोध असला तरी हा प्रकल्प होणार असून त्याबाबतचा सामंजस्य करार लवकरच केला जाईल. मात्र त्यापूर्वी लोकांच्या सर्व शंकाचे समाधान करून त्यांना सोबत घेऊनच हा प्रकल्प केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केली.

राजापूर तालुक्यातील नाणार गावाजवळ १५ हजार एकर जमिनीवर तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करून रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्स कंपनीतर्फे जगातील सर्वात मोठी रिफायनरी उभारली जाणार आहे. भारत पेट्रोलियम, इंडियन ऑईल आणि हिंदुस्थान पेट्रोलियम याच्या भागीदारीतून स्थापन झालेल्या कंपनीतर्फे ही रिफायनरी उभारली जाणार असून सन २०२३पर्यंत तिचे काम पूर्ण होईल असा कंपनीचा दावा आहे. सुमारे १५ हजार एकर जागेवरील  या रिफायनरीत एक हजार एकर जागेवर स्टोरेज टँक असतील. या रिफायनरीतून प्रतिवर्षी ६०दशलक्ष टन पेट्रोलियम पदार्थाचे उत्पादन होणार असून या  प्रकल्पाच्या माध्यमातून १५ ते २० हजार लोकांना  प्रत्यक्षात तर एक लाख लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळेल. मात्र या प्रकल्पामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होणार असून मच्छिमारीही  धोक्यात येणार असल्याचा दावा करीत कोकणातील लोकांनी या  रिफायनरीला विरोध सुरू केला आहे. शिवसेनेनेही या प्रकल्पास विरोध केला असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या प्रकल्पास स्थानिक लोकांचा तसेच आमचाही विरोध असल्याने मॅग्नेटिक महाराष्ट्रात सामंजस्य करार करू नये अशी मागणी केली होती. त्यानुसार लोकांच्यावर कोणताही प्रकल्प लादला जाणार नाही असे सांगत, या रिफायनरीबाबताच सामंजस्य करार मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेत केला जाणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली होती.

शिवसेना आणि स्थानिकांचा या  प्रकल्पास विरोध आहे, त्यामुळेच आता सामंजस्य करार झालेला नाही. चेंबूरजवळ  गेल्या ४०  वर्षांपासून रिफायनरी असून त्याचा कोणताही परिणाम किंवा दुर्घटना घडलेली नाही. रत्नागिरी रिफायनरीचे तंत्रज्ञान तर अत्याधुनिक असून त्याचा पर्यावरणावर कसलाही परिणाम होणार नाही. या प्रकल्पाबाबतच्या लोकांच्या सर्व शंका दूर करणार असून त्यांना सोबत घेऊनच हा प्रकल्प करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.