तरुणांच्या आशयघन कल्पनाविष्काराला परीक्षकांची दाद; स्पर्धेचे पडघम लवकरच

तरुणवर्गाच्या विचारांचे प्रतिबिंब उमटवणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिके’त यंदा महाविद्यालयीन तरुण कोणते विषय घेऊन येतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नाटय़प्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’चे सहावे पर्व लवकरच सुरू होणार आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेकरिता आशयघन नाटकांची निवड करण्याची जबाबदारी परीक्षकांवर असते. तरुणांची मानसिकता, विचार, कल्पनाशक्ती लढवून केलेली नाटके उत्कृष्ट असल्याचे मत या निमित्ताने ‘लोकसत्ता लोकांकिके’करिता परीक्षणाची जबाबदारी सांभाळणाऱ्या नाटय़क्षेत्रातील नामांकित रंगकर्मीनी व्यक्त केले.

नाटय़विश्वात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ची प्राथमिक फेरी लवकरच सुरू होईल. ‘लोकसत्ता लोकांकिका’ नि:पक्षपाती निकालासाठी ओळखली जाते. तीन टप्प्यांत पार पडणाऱ्या या स्पर्धेचे परीक्षण नाटय़क्षेत्रात कार्यरत असलेल्या जाणकारांकडून केले जाते. आतापर्यंत लोकांकिका स्पर्धेला अनेक उत्तम परीक्षकांची साथ लाभली आहे. गेल्या वर्षी महाअंतिम फेरीचे परीक्षण नाटय़कर्मी शफाअत खान, अभिनेता सचिन खेडेकर आणि अभिनेत्री चिन्मयी सुमीत यांनी केले.

लोकांकिकांविषयी आपला अनुभव मांडताना चिन्मयी सुमीत म्हणाल्या, ‘लोकसत्ता लोकांकिकां’च्या परीक्षणाचा अनुभव अत्यंत बोलका आहे. महाअंतिम फेरीसाठी शफाअत खान आणि सचिन खेडेकर यांच्यासारख्या रंगभूमीसाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या आणि समविचारी लोकांसोबत नाटकाचे परीक्षण करण्याचा अनुभव अत्यंत वेगळा होता. स्पर्धेचे परीक्षण करताना खऱ्या अर्थाने परीक्षकांची कसोटी लागली. या स्पर्धेत फक्त पुणे आणि मुंबईतून नाही तर राज्यभरातून विविध आशयांच्या नाटकांचे सादरीकरण करण्यात येते. परीक्षण करताना नाटकाचे नेपथ्य, तंत्रज्ञान, प्रकाशयोजना आणि संगीत यांमध्ये विविधता दिसून येते. दरवर्षी लोकांकिका स्पर्धेचे आयोजन उत्तमरीत्या करण्यात येते. विद्यार्थ्यांना आवश्यक सोयीसुविधांसाठी संपूर्ण साहाय्य ‘लोकसत्ता’तर्फे केले जाते. त्यामुळे कलाकारांना तडजोडी कराव्या लागत नाही.’

खरे तर परीक्षणाचा कस विभागीय फेरीतच लागतो. मुंबई विभागीय अंतिम स्पर्धेत लेखक अजित भुरे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. ते म्हणतात, ‘स्पर्धेत कलाकारांनी नाटकात सामाजिक विषय तसेच चालू घडामोडींवर सादरीकरण केले. प्रकाशयोजना, ध्वनी, नेपथ्य यांचे नवीन तंत्र शिकून त्याचा उपयोग नाटकात केल्याचे निदर्शनास आले. नाटकात तरुणवर्गाच्या विचारांचे प्रतिबिंब दिसले. त्यांची मानसिकता, विचार, कल्पनाशक्ती लढवून केलेली नाटके उत्कृ ष्ट असतात.’

‘लोकसत्ता लोकांकिके’त विद्यार्थ्यांना चांगलाच कस लागतो. ‘लोकसत्ता’सारखे प्रसारमाध्यम एकांकिकांना महत्त्व देत असल्याने ही कला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होते आहे. ‘लोकसत्ता’ने एक उत्कृष्ट वाचकवर्ग तयार केला आहे. तितकेच चांगले कलाकारही लोकांकिकेच्या माध्यमातून घडवले आहेत. जसे ‘वक्ता दशसहस्र्ोषु’ स्पर्धेत स्पर्धकांची कार्यशाळा घेतली जाते. तसेच महाअंतिम फेरीसाठी निवड झालेल्या कलाकारांची कार्यशाळा घेणे गरजेचे आहे,’ अशी सूचना ठाणे विभागीय अंतिम फेरीत परीक्षण केलेल्या अभिनेत्री संपदा जोगळेकर- कुलकर्णी यांनी केली.

प्रायोजक

नाटय़वर्तुळात मानाची स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘लोकसत्ता’ आयोजित ‘सॉफ्टकॉर्नर’ प्रस्तुत ‘लोकसत्ता लोकांकिका’ ही राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा ‘अस्तित्व’च्या सहकार्याने पार पडते. ‘आयओसीएल’ पावर्ड बाय असलेल्या या स्पर्धेसाठी ‘मे.बी.जी. चितळे डेअरी’ हे असोसिएट पार्टनर आहेत. तर दरवर्षीप्रमाणे लोकांकिकाच्या मंचावरील गुणवान कलाकारांना चित्रपट मालिका क्षेत्रात उतरण्याची संधी देणारे ‘आयरिस प्रॉडक्शन’ हे यंदाही स्पर्धेचे टॅलेंट पार्टनर आहेत.