राज्य सरकारने परीक्षा रद्द केल्याची घोषणा केली असली तरी मुंबई विद्यापीठाने मात्र विद्यार्थ्यांंकडून परिक्षा शुल्क वसुली सुरू ठेवली असून ती तात्काळ थांबवावी व घेतलेले शुल्क परत करावे, अशी मागणी भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी कुलपती व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली.

सरकारने विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द केल्या, मात्र परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांकडून घेतले जात आहे. मुंबई विद्यापीठाने सर्व महाविद्यालयांना याबाबतचे आदेश पाठविले असून शुल्क विद्यापीठाकडे जमा करावे, असे निर्देश दिले आहेत. सरकारकडून विद्यार्थ्यांची छळवणूक सुरु असल्याचे शेलार यांनी म्हटले आहे.

दरम्यान,काँग्रेसला पेट्रोल डिझेल दरवाढीवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, असे शेलार यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दरानुसार आपल्या देशातील तेलाचे भाव ठरवण्याचा निर्णय काँग्रेस सरकारच्या काळात झाला. त्यामुळे आता त्यानुसार भाव वाढत आहेत. ही बाब आम्ही जनतेपर्यंत पोचवीत आहोत असे स्पष्ट केले.