प्रसाद रावकर

करोना विषाणूच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे मुंबई महापालिकेने असंख्य बेघर, बेरोजगार कामगारांच्या निवाऱ्याची आणि दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था केली. मात्र नियमानुसार किमान वेतन घेऊन पावसाळापूर्व कामे अथवा रस्ते दुरुस्तीची कामे करण्यास ही कामगार मंडळी तयार नाही. ‘अभी तो गांव जाना हैं’, असे उत्तर देऊन या कामगारांनी पालिका अधिकाऱ्यांचीच बोळवण केली.

टाळेबंदी आणि संचारबंदी लागू झाल्यानंतर जीवनावश्यक वस्तू वगळून अन्य दुकाने, कंपन्यांची कार्यालये, छोटय़ा-मोठय़ा उद्योगांचे कारखाने, वस्त्यांमधील लघुउद्योग आदींचा कारभार ठप्प झाला. यामुळे अनेक जण बेरोजगार झाले. हाताला काम नाही, खिशात पैसे नाहीत, गावी जाण्याचे मार्ग बंद झालेले अशा परिस्थितीत अनेक कामगार अस्वस्थ झाले होते. काहींनी थेट चालत गावची वाट धरली. अशा कठीण परिस्थितीत पालिकेने बेरोजगार, बेघर कामगारांना मदतीचा हात पुढे केला. या मंडळींसाठी ठिकठिकाणी निवाऱ्याची व्यवस्था केली. तसेच दोन वेळचे जेवणही त्यांना पुरविण्यास सुरुवात केली. मात्र या कामगारांना आता गावची आस लागली आहे.

पालिकेने मुंबईमधील लहान-मोठय़ा रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे यापूर्वीच हाती घेतली आहेत. मात्र करोनाने थैमान घालण्यास सुरुवात केल्यामुळे रस्ते दुरुस्तीच्या कामासाठी मजुरांचा तुटवडा भासू लागला आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी नदी-नाल्यांची सफाई, दुरुस्ती आदी कामे युद्धपातळीवर पूर्ण करणे गरजेचे आहे. मात्र या कामांसाठीही मनुष्यबळाचा तुटवडा भासत आहे. परिणामी रस्ते दुरुस्ती आणि नदी-नालेसफाईची कामे संथ गतीने सुरू आहेत. ही बाब लक्षात घेत पालिकेच्या काही विभाग कार्यालयांमधील सहाय्यक आयुक्तांनी आपापल्या हद्दीतील निवाऱ्याच्या आश्रयाला असलेले मजूर, कामगार आदींना ही कामे करण्याबाबत विचारणा केली होती. त्यांना किमान वेतन देण्यात येईल, असेही सांगितले होते. मात्र ही मंडळी कामे करण्यास तयार नाहीत. ‘अभी तो गाव जाना हैं’, धूप मे काम कैसे करेंगे, असे उत्तर देत बहुसंख्य मंडळींनी काम करण्यास स्पष्ट नकार दिला.

नैराश्याच्या गर्तेत..

गावी जाता येत नसल्यामुळे पालिकेच्या निवाऱ्यांमधील कामगारांना सध्या प्रचंड नैराश्य आले आहे. या कामगारांनी रस्ते दुरुस्ती आणि पावसाळापूर्व कामे केली असती तर त्यांचा वेळ गेला असता आणि चार पैसेही त्यांच्या पदरात पडले असते. पण ही मंडळी काम करण्यास तयारच नाहीत, असे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.