इंटरनेट विश्वात आता भारतीय प्रादेशिक भाषांना अधिक पसंती मिळू लागली आहे. भारतीय भाषांमधील माहिती वाढू लागली आहे, याचबरोबर जाहिरातदारही प्रसिद्धीसाठी भारतीय भाषांचा वापर करू लागले आहेत. यामुळे येत्या काळात भारतीय इंटरनेट वापरकर्त्यांना भारतीय भाषांमध्ये अधिकाधिक माहिती उपलब्ध होणार असल्याचे भाकीत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांतर्फे ‘अनलॉकिंग इंडियाज टेक्नॉलॉजी पोटेन्शिअल थ्रू लँग्वेज इन्क्लुजन’ या विषयावर एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये संशोधन करणारी आयएमआरबी इंटरनॅशनल, हिंदी भाषेत सर्च इंजिन चालविणारी रफ्तार, मोबाइल जाहिरात एक्स्चेंज व्हसव्‍‌र्ह.मोबी आणि भारतीय भाषांमध्ये अ‍ॅप्स आणि संबंधित सुविधा पुरविणारी कंपनी रिवेरी यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
भारतात आजही इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या केवळ १३.३ टक्केइतकीच आहे. सध्या मायाजालात प्रादेशिक भाषांची  माहिती वाढत आहे. २०१२च्या तुलनेत सन २०१३मध्ये भारतीय भाषांमधील माहिती तयार होण्याचे प्रमाण तब्बल नऊ टक्क्यांनी वाढल्याचे आयएमआरबीचे प्रवक्ते तरुण अभिचंदानी यांनी स्पष्ट केले.  भारतीय नेटकर्त्यांपैकी ७० टक्केलोक हे ई-मेलसाठी भारतीय भाषांचा वापर करतात तर ४० टक्के लोक आपल्या मातृभाषेत बातम्या वाचणे पसंत करीत असल्याचेही त्यांनी नमूद केले. भारतीय भाषांमध्ये सध्या उपलब्ध असलेली संकेतस्थळांपैकी बहुतांश संकेतस्थळाचे वापरकर्त्यांचे पान हे भारतीय भाषेत असते आणि त्यातील पर्यायांमध्ये जेव्हा आपण क्लिक करतो, तेव्हा मात्र ते इंग्रजीतच दिसते. यामुळेही अनेक इंटरनेट वापरकर्ते मागे सरसावत असल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदविले.
रफ्तार या पहिल्या हिंदी सर्च इंजिनचे विपणन आणि व्यवसाय विकास विभागाचे उपाध्यक्ष सूरजीत सिंग यांनी सांगितले की, आम्ही संकेतस्थळाचे प्रथमदर्शनी पान हे विविध विभागांमध्ये विभागले आणि त्यातून शोधण्याचे पर्याय खुले केले. भारतीय लोकांनी हिंदी सर्च इंजिनला चांगला प्रतिसाद दिला. हे सर्च इंजिन सुरू झाले त्या वेळेस दिल्ली किंवा उत्तर भारतातून त्याला प्रतिसाद मिळेल असे वाटले होते. मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही याला सर्वाधिक प्रतिसाद हा मुंबई, पुणे या शहरांमधून मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.  भारतीय इंटरनेट वापरकर्त्यांना त्यांच्या भाषेतून माहिती मिळवण्याचा पर्याय आता वाढत असून यातून इंटरनेट वापकर्त्यांची संख्याही वाढेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
भारतीय भाषांमधील फॉण्टच्या अडचणींबाबत नेहमीच बोलले जाते. पण त्यावर संशोधन करून आम्ही उपाय काढल्याचे रिवेरी लँग्वेज टेक्नॉलॉजीचे सहसंस्थापक अरविंद पानी यांनी स्पष्ट केले. भारतीय भाषांमधील फॉण्ट टाइप करण्यासाठी खूप अवघड असतात. सध्या बाजारात जे युनिकोड फॉण्ट उपलब्ध आहेत, त्यामध्ये अनेक टंकचुका आढळून येतात. यामुळे अनेकांना भारतीय भाषांमध्ये संकेतस्थळ वापरणे अवघड वाटते. मात्र आता ही परिस्थिती बदलत आहे. मायक्रोमॅक्सने नुकताच २१ भारतीय भाषांचा समावेश असलेला मोबाइल बाजारात आणला आहे. यामध्ये आमच्या कंपनीचा सहभाग असून यामुळे भारतीय भाषांचा वापर अधिक वाढणार असल्याचेही ते म्हणाले. जाहिरातदारांबद्दल मत व्यक्त करीत असताना मोबाइल अ‍ॅप्ससाठीचे जाहिरात व्यवस्थापन करणारी वसव्‍‌र्ह या कंपनीचे जागतिक व्यवसाय विकास संचालक प्रशांत दीक्षित यांनी जाहिरातदारही स्थानिक भाषांना प्राधान्य देत असल्याने या संकेतस्थळावरील किंवा अ‍ॅप्समधील जाहिरातींचा पुरवठा वाढत असल्याचे नमूद केले.