शहरात गुरुवारपासून १३ खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्र सुरू झाली असून पुढील दोन दिवसांत नोंदणी करून लसीकरण करण्याची सुविधाही सुरू होणार आहे. जेणेकरून नोंदणी न केलेल्यांनाही थेट या रुग्णालयांमध्ये लस घेण्यास जाता येईल. तसेच गुरुवारी दिवसभरात अ‍ॅपबाबत कोणत्याही तक्रारी आल्या नसल्याने सर्व केंद्रावर लसीकरण सुरळीतपणे सुरू होते.

लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी अधिकाधिक रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. ‘पहिल्याच दिवशी १३ रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्र सुरळीतपणे सुरू झाली. रुग्णालयांमध्ये विनाकरण गर्दी आणि गोंधळ नको यासाठी काही दिवस संकेतस्थळावर आधी नोंदणी केलेल्यांचेच लसीकरण करण्याची सूचना दिलेली आहे. दोन दिवसांत व्यवस्था सुरळीतपणे सुरू झाली की नोंदणी करण्याची सुविधाही कार्यरत केली जाईल’, असे बॉम्बे रुग्णालयाचे फिजिशियन डॉ. गौतम भन्साली यांनी सांगितले. पहिल्या दिवशी दोन कक्ष सुरू केले असून दिवसभरात कोणत्याही तांत्रिक अडचणी आल्या नाही. सुरुवातीला नोंदणी केलेल्यांचे लसीकरण केले जात असले तरी शुक्रवारपासून नोंदणी न केलेल्यांचेही लसीकरण आम्ही करणार आहोत, अशी माहिती लीलावती रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी डॉ. रविशंकर यांनी दिली.

खासगी रुग्णालयांचे प्रशिक्षण झाले असून लवकर लसीकरण केंद्र सुरू करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तसेच विविध विमा योजनेअंतर्गत असलेल्या रुग्णालयांनाही सूचना दिल्या असून जसजशी त्यांची तयारी होईल, तसतसा रुग्णालयांना लशींचा साठा पुरविण्यात येत आहे. सुरुवातीला आठ दिवसांचा साठा दिला जात आहे. त्यांच्या क्षमतेनुसार लसीकरण कक्ष सुरू करण्यास परवानगी दिली जाते, असे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.

गुरुवारी दिवसभरात अ‍ॅपमध्ये कोणत्याही तांत्रिक अडचणी आल्या नसल्याने लसीकरण अधिक वेगाने होत आहे,  तसेच नोंदणीही वेगाने केली जात आहे.

– डॉ. बाळकृष्ण अडसूळ, अधिष्ठाता, सेव्हन हिल्स रुग्णालय