सोळा वर्षांच्या निमेशला अपस्मार किंवा अनियंत्रित फिट्स यायच्या. दिवसातून किती वेळा आकडी येईल याचा अंदाज नव्हता. निमेशचा आजार औषधांना दाद देण्याच्या पलीकडे गेला होता. एक दिवस त्याच्या घरच्यांना नियंत्रित आहाराच्या माध्यमातून हा आजार आटोक्यात येऊ शकतो याची माहिती मिळाली. मग सुरू झाली ‘किटोन डाएट’ उपचार पद्धती. काही महिन्यांतच फिट्सचे प्रमाण कमी झाले आणि तीन वर्षांनंतर निमेश पूर्ण बरा झाला. अमेरिकेतील जॉन हाफकिन्स विश्व विद्यालयात यावर प्रचंड संशोधन झाले असून मुंबईतही हा सुनियंत्रित आहाराचा उपचार गेली अनेक वर्षे केला जात आहे.

एपिलेप्सी म्हणजे अपस्माराचे भारतात आजघडीला एक कोटी वीस लाख रुग्ण आहेत. यातील तीस टक्के रुग्णांचा आजार हा औषधाने आटोक्यात येण्यापलीकडचा असतो. बऱ्याच वेळा अनेक वर्षे औषधे घेतल्यानंतर त्याचे परिणाम होईनासे होऊन रुग्णांना सातत्याने फिट्सचा सामना करावा लागतो. डॉ. हावलंड आणि डॉ. गॅम्बल यांनी अमेरिकेत यावर प्रथम संशोधन केले. नियंत्रित आहाराने शरीरातच किटोन बॉडिज तयार होऊन मेंदूमधील फिट्सला कारणीभूत ठरणाऱ्या पेशींवर परिणाम करतात असे आढळून आले. अमेरिकेतील जॉन हाफकिन्समध्ये डॉ. फ्रिमन यांनी मेंदूतील पेशींवर होणाऱ्या किटोनच्या परिणामांवर संशोधन करून सुनियंत्रित आहाराने फिट्सवर नियंत्रण आणता येते हे दाखवून दिले. मुंबईतील विख्यात न्यूरॉलॉजिस्ट डॉ. जे. नाथन यांनी डॉ. फ्रिमन यांच्याबरोबर या विषयावर संशोधन करून ‘किटोजनिक डाएट’ पद्धतीचा विकास करून हजारो रुग्णांवर उपचार केले. डॉ. नाथन यांनी १९९६ पासून  अपस्माराच्या रुग्णांवर किटोजनिक डाएटच्या माध्यमातून उपचार करण्याचे काम सुरू केले. अपस्मारावर प्रभावी औषध शोधण्याचे प्रयत्न आजही सुरू आहेत. काही प्रमाणात ही औषधे उपकारक ठरतात. रुग्णांना बरेही करतात. काही वेळा शस्त्रक्रियेच्या माध्यमातूनही असे रुग्ण बरे होतात. तथापि दोन्ही उपचारांच्या काही मर्यादा आहेत. या साऱ्यात औषधांचे दुष्परिणाम अटळ असतात. आश्चर्यकारक म्हणजे अपस्मारावर नियंत्रण आणणारे औषध आपल्याच शरीरात तयार होत असते. ‘किटोन बॉडिज’ असे या औषधाचे नाव असून यासाठी संतुलित आणि नियंत्रित आहार कमालीच्या अचूकतेने देणे ही यशाची गुरुकिल्ली आहे. स्निग्ध पदार्थापासून शरीरात चरबी तयार होते. स्निग्ध पदार्थाच्या वापराने शरीरात प्रथिने व काबरेदकांचे प्रमाण ४:१ असे ठेवले तर ‘किटोन बॉडिज’ सतत तयार होतात व रुग्णाला त्याचा फायदा मिळतो. कोणत्याही दुष्परिणामाशिवाय व रुग्णालयात दाखल न करता रुग्ण बरा होऊ शकतो, असे डॉ. नाथन यांनी सांगितले. गेली दोन दशके देशभरात वेगवेगळ्या भागांत शेकडो शिबिरे घेऊन हजारो गोरगरीब रुग्णांना या आजारापासून सुटका केली असून कॅन्सरवर या पद्धतीचा उपयोग या विषयावर सध्या त्यांचे संशोधन सुरू आहे. परळच्या ‘टाटा कॅन्सर’च्या सहकार्याने हे संशोधन पुढे नेण्याचा त्यांचा मानस आहे. डॉ. फ्रिमन यांच्या जयंतीनिमित्त येत्या १० जानेवारी रोजी दादर येथील ब्राह्मण साहाय्यक संघात सकाळी अकरा वाजता ‘किटोजनिक डाएट’ या विषयावर डॉ. नाथन यांनी मोफत कार्यशाळेचे आयोजनही केले आहे.