कांदळवन कक्षाकडे महापालिकेचा प्रस्ताव; वरळी, हाजी अली येथील अनेक प्रवाळ वसाहती धोक्यात

मुंबई : विकासप्रकल्पांमुळे नागरिकांचे विस्थापन, पुनर्वसन करण्यात येत असताना आता मुंबईतील सागरी किनारा मार्गासाठी जैवविविधतेतील महत्त्वाचा घटक असलेल्या प्रवाळांवरही हीच वेळ येणार आहे. पालिकेच्या महत्त्वाकांक्षी सागरी किनारा मार्गामुळे वरळी आणि हाजी अली येथील प्रवाळांच्या वसाहतींना धोका असल्याने त्या सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येणार आहेत. त्यासाठी पालिकेने कांदळवन कक्षाकडे प्रस्ताव पाठवला असून ऑक्टोबरमध्ये ही स्थानांतरण प्रक्रिया करण्याचे घाटले आहे.

सागरी किनारा मार्गाच्या टप्प्यात हाजी अली येथे ०.११ चौरस मीटर आणि वरळी येथे ०.२५ चौरस मीटर इतक्या आकारमानाच्या एकूण १८ प्रवाळ वसाहती आहेत. किनारा मार्गामुळे त्या प्रभावित होणार असल्याने त्यांचे अन्यत्र स्थानांतर करावे लागणार आहे. स्थानांतरणाचे काम गोवा येथील राष्ट्रीय समुद्री विज्ञान संस्था (नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशोनोग्राफी – एनआयओ) यांच्या तज्ज्ञांमार्फत केले जाईल.

या संदर्भात कांदळवन कक्षाकडे प्रस्ताव आला असून, त्यात काही त्रुटी असल्याने तो पुन्हा पालिकेस पाठविल्याचे, कांदळवन कक्षाचे विभागीय वनाधिकारी डी. आर. पाटील यांनी सांगितले. प्रवाळांचे स्थानांतर नेमके कोणत्या ठिकाणी करण्यात येईल याबाबतची स्पष्टता प्रस्तावात नसल्याचे त्यांनी सांगितले. विभागीय अधिकाऱ्यांकडून हा प्रस्ताव कांदळवन कक्षाच्या अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षकांकडे जाईल, त्यानंतर राज्याच्या प्रधान मुख्य वन्य संरक्षकांची मान्यता आवश्यक असेल.

या संदर्भात कांदळवन कक्षाच्या मागणीनुसार सविस्तर माहिती लवकरच पाठवली जाईल असे पालिकेच्या अभियंत्यांनी सांगितले, तर प्रवाळांचे स्थानांतर करण्यात येणारी जागा वनाधिकारी यांना यापूर्वी दाखवली असल्याचे, सागरी किनारा मार्ग प्रकल्पाचे पर्यावरण सल्लागार विवेक कुलकर्णी यांनी सांगितले.

परवानगीची प्रक्रिया १७ ऑक्टोबपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यावेळी न्यूनतम ओहोटी असल्याने १७ ते १९ ऑक्टोबरदरम्यान प्रवाळ स्थानांतराचे करण्यास पुरेसा अवधी मिळू शकतो. अन्यथा पुढील न्यूनतम ओहोटीसाठी दीड ते दोन महिने वाट पाहावी लागेल. या काळात उघडीप अधिक मिळत असल्याने हे काम करणे शक्य असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

स्थानांतराची प्रक्रिया

* वरळी येथील प्रवाळ वसाहत ही खडकावर आहे. त्यामुळे या खडकाचे तुकडे काढून ते अन्य जागी खड्डय़ात बसवावे लागतील.

* हाजी अली येथील प्रवाळ हे स्वतंत्र शिळाखंडावर (बोल्डर) असल्याने तो बोल्डर तसाच उचलून दुसरीकडे ठेवला जाईल.

* त्यानंतर १२ महिने या प्रवाळांचे जगणे, वाढ होणे याचे निरीक्षण केले जाईल, असे सागरी किनारा मार्ग प्रकल्पाचे पर्यावरण सल्लागार विवेक कुलकर्णी यांनी सांगितले.

* न्यूनतम ओहोटीच्या वेळी तीन तास काम करणे शक्य होईल. या कामास एकूण आठ तास अपेक्षित आहेत.

* एनआयओने यापूर्वी देशात कच्छच्या आखातात आणि आखाती देशात असे प्रयोग केले आहेत. स्थानांतरामुळे प्रवाळ जगणे, वाढणे याच्या यशाचे प्रमाण ७० ते ९० टक्के  इतके असल्याचे त्यांनी नमूद केले. मुंबईतील प्रदूषित पाण्यामुळे त्यावर काय परिणाम होतो हे पाहणे महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले.