महाराष्ट्र सदनाच्या बांधकाम घोटाळ्यासह अन्य आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी सध्या कारागृहात असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आपल्याला वृद्ध म्हणून नव्हे, तर प्रकृती खूपच खालावली असल्याने जामीन देण्याची केलेली विनंती विशेष न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली. त्यामुळे भुजबळांना कारागृहातच राहावे लागणार आहे.
आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत स्थापित विशेष न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश पी. आर. भावके यांनी अंमलबजावणी संचालनालयाचे म्हणणे मान्य करत भुजबळ यांनी आरोग्याचे कारण पुढे करत जामीन देण्याची केलेली विनंती फेटाळली. त्यामुळे भुजबळ यांच्या प्रकृतीची आवश्यक ती काळजी घेण्यात येत असून, त्यांना या कारणासाठी जामीन देण्याची गरज नसल्याचा दावा ‘ईडी’ने अर्जाला विरोध करताना केला होता. तो न्यायालयाने मान्य केला.