‘लोकसत्ता व्हिवा लाउंज’मध्ये रेखा चौधरी यांचा प्रवास उलगडणार
स्पा आणि वेलनेस या नव्याने लोकप्रिय होणाऱ्या क्षेत्रात देशातील आघाडीचे नाव आहे रेखा चौधरी. एका छोटय़ा गावातील ‘ब्युटी पार्लर’पासून सुरुवात करून आंतरराष्ट्रीय पातळीवरील ‘स्पा एक्स्पर्ट’पर्यंतचा रेखा यांचा प्रवास येत्या बुधवारी होणाऱ्या लोकसत्ता व्हिवा लाउंजमधून उलगडणार असून, त्यांच्याकडून या क्षेत्रातील करिअर मंत्रही मिळणार आहे.
नंदुरबारसारख्या ग्रामीण भागात शिक्षण झाल्याने इंग्रजीचा गंध नाही, नवीन सौंदर्योपचारांची तोंडओळखही नाही, अशी सामान्य पाश्र्वभूमी असतानाही रेखा यांनी हे विस्मयकारक यश मिळवले आहे. देशी-विदेशी स्पा उत्पादनांच्या व्यवसायाखेरीज, साहित्यसामग्री, सेवा आणि या क्षेत्रातील प्रशिक्षणाचे कामही रेखा यांनी स्थापन केलेली जेसीकेआरसी ही कंपनी करते. याशिवाय स्पा ट्रीटमेंटचे आंतरराष्ट्रीय पेटंट घेणारी ती पहिली भारतीय स्त्री आहे. नंदुरबारच्या रेखा लग्नानंतर धुळे जिल्ह्य़ात आल्या. तेथे स्वतचे छोटे ब्युटी पार्लर चालवत होत्या. पुढे मुलींच्या शिक्षणासाठी मुंबईत आल्या आणि मुलींबरोबर इंग्रजी बोलायला शिकल्या. दरम्यान, एका परदेशी सौंदर्यप्रसाधनाची विक्री करण्याच्या निमित्ताने स्पा उद्योगाशी त्यांचा संपर्क आला आणि या क्षेत्रात अल्पावधीतच त्यांनी मुसंडी मारली. सध्या वीसपेक्षा जास्त विदेशी ब्रॅण्ड्च्या त्या वितरक असून विपणनाची जबाबदारीही त्या पाहतात. या मोठय़ा ब्रॅण्डना स्पा व्यवस्थापनाचे धडेही त्या देतात.
देशातील बहुतेक सर्व मोठय़ा पंचतारांकित हॉटेल्समधील, मोठय़ा सलाँमधील स्पा सेवांचे व्यवस्थापन त्यांच्याकडे आहे. याशिवाय वेलनेस उद्योगातील प्रशिक्षण देणारी संस्थाही त्यांनी स्थापन केली आहे. त्यामार्फत स्पा आणि वेलनेस क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या तरुणांना त्या मार्गदर्शन करीत आहेत. भारतात मेडिकल टुरिझमला सुरुवात झाल्यानंतर स्पा उद्योगाची भर घालून त्यासंदर्भातील सल्लागार समितीवरदेखील रेखा कार्यरत आहेत. वेलनेस क्षेत्रातील करिअर संधी, या क्षेत्रातील आव्हाने, यशाचे मार्ग यासंदर्भातील प्रश्नांची उत्तरे रेखा यांच्याबरोबर होणाऱ्या ‘केसरी प्रस्तुत लोकसत्ता व्हिवा लाउंज’मधील संवादातून मिळू शकतील. हा कार्यक्रम सर्वासाठी खुला असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश मिळेल.

* कधी – बुधवार, १६ मार्च
* कुठे – स्वा. सावरकर स्मारक सभागृह, शिवाजी पार्क, दादर (प.), मुंबई</strong>
* वेळ – सायंकाळी ४.४५
* प्रवेश : प्रथम येणाऱ्यास प्राधान्य