डॉक्टरांवर हल्ला झाल्याप्रकरणी कोलकाता येथील डॉक्टरांनी संप पुकारला होता. या संपाला देशभरातल्या निवासी डॉक्टरांनी पाठिंबा दिला होता. ही घटना ताजी असतानाच आता मुंबईतील नायर रुग्णालयात तीन निवासी डॉक्टरांना दहा ते बारा जणांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. नायर रुग्णालयात एका ४९ वर्षीय रुग्णाच्या नातेवाईकांनी तीन निवासी डॉक्टरांना शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या ४९ वर्षीय रुग्णाला नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या रुग्णालयात उपचारा दरम्यान या रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर तीन निवासी डॉक्टरांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी FIR नोंदवण्यात आली आहे. आग्रीपाडा पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

या तीन डॉक्टरांना वाचवण्यासाठी मधे पडलेल्या सुरक्षारक्षकांनाही जमावाने चोप दिला. एवढंच नाही तर रुग्णालयातील वस्तूंचीही तोडफोड केली. इतर सहकारी डॉक्टरांनी धाव घेत जमावाच्या तावडीत सापडलेल्या या तीन डॉक्टरांना कसेबसे वाचवले. निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा समोर आला आहे.

ज्या रुग्णाचा मृत्यू झाला त्याला क्षय रोग झाला होता. तसेच इतर संसर्गजन्य आजारांची त्याला लागण झाली होती. रविवारी सकाळी सात वाजता नायर रुग्णालयात या रुग्णाला उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. जेव्हा या रुग्णाला उपचारासाठी आणले गेले तेव्हाच त्याची प्रकृती गंभीर होती. त्याची प्रकृती सुधारावी यासाठी डॉक्टरांनी हर तऱ्हेचे प्रयत्न केले. मात्र संध्याकाळी या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रुग्णाच्या नातेवाईकांना ही बाब सांगण्यासाठी गेलेल्या डॉक्टरांना जमावाने मारहाण केली आणि शिवीगाळही केली. या तीन डॉक्टरांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. मार्डच्या कल्याणी डोंगरे यांनी ही माहिती दिली.