News Flash

राजावाडी रुग्णालयात मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश

संध्याकाळी चार वाजेपर्यंत मृतदेह घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात आणले जात होते.

मुंबई: चेंबूरमधील दुर्घटनेला १६ तास उलटून गेले तरीही रविवारी संध्याकाळी चार वाजेपर्यंत मृतदेह घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात आणले जात होते.

‘घटना घडल्याचे समजल्यावर धावतच रात्री एक वाजता बहिणीच्या घराकडे धावत सुटले. परंतु वरती कोणीच जाऊ देत नव्हते. रात्री अडीचच्या सुमारास बहिणीच्या मुलीचा मृतदेह मिळाला आणि पायाखालची जमीन सरकली. तसेच जड पावलाने मी रात्री तीन वाजता राजावाडीमध्ये आले.

त्यानंतर बहीण, तिचा दहा वर्षांचा मुलगा यांचे मृतदेह रुग्णालयात आणण्यात आले.  सायंकाळी चार वाजले तरी अजून बहिणीच्या पतीचा मृतदेह मिळालेला नाही. एका रात्रीत सारं संपून जाईल, असा विचारही आला नव्हता’, असे वैशाली गवळी (मृत शीला पारधे (४०) यांची बहीण) यांनी सांगितले.

मला एका नातेवाईकांनी बातमी बघून फोन केल्यावर समजले तशी धावत चेंबूरला गेले. माझा एकच भाचा आता राहिला आहे. भाऊ, त्याची बायको, मुलगी सगळे कुटुंब गेले, असे भाच्याला पोटाशी धरून राहिलेल्या एका महिलेने सांगितले.

नातेवाईक सायंकाळपर्यंत ताटकळत

काही वेळाने रुग्णवाहिका रुग्णालयाच्या आवारात दाखल होताच नातेवाईकांचा काळजाचा ठोका चुकत होता. आपले कु णी नसल्याची खात्री झाली की निमूटपणे ही गर्दी पांगली जायची. एखादा ओळखीचा मृतदेह आला की नातेवाईकांच्या हंबरडय़ाने रुग्णालयातील इतर नातेवाईकांचाही बांध फुटायचा. आक्रोश, मागे राहिलेल्यांची चिंता, इतक्या वर्षांंनी उभे केलेले संसार मातीमोल झाल्यानंतर पुन्हा उभे राहण्यासाठी धीर देणारे हात एकीकडे दिसत होते, तर दुसरीकडे ओळख पटवून शवविच्छेदनासह सर्व  प्रक्रिया पार पाडून मृतदेह लवकर ताब्यात घेण्यासाठी नातेवाईकांची कसरत सुरू होती.

तीन जखमींवर उपचार

चेंबूरच्या दुर्घटनेत सात जण जखमी झाले असून तीन जण सध्या राजावडी रुग्णालयात दाखल आहेत. लक्ष्मी गंगावणे (४०) आणि त्यांची मुलगी विशाखा गंगावणे (१५) यांना डोक्याला मोठी दुखापत झाली. अक्षय झिमूर (२६) याच्या पायाला जखमा झालेल्या आहेत.

बहुतांश मृत्यू गुदमरल्यामुळे चेंबूरच्या भारतनगर, विक्रोळी आणि चांदिवली येथील दुर्घटना एकाच वेळी घडल्यामुळे राजावाडी रुग्णालयात रविवारी एकच गर्दी झालेली होती. रात्री तीनपासून मृतदेह येण्यास सुरुवात झाली. मोठी घटना घडल्याचे लक्षात आल्याने लगेचच इतर विभागातील कर्मचारी बोलाविण्यात आले. सायंकाळी चापर्यंत चेंबूर येथील १५, तर विक्रोळीतील पाच असे एकूण वीस मृतदेह आणलेले होते. बहुतांश मृत्यू हे गुदमरून झाल्याचे प्राथमिकरीत्या आढळते. अनेकांना अंगावर ढीग कोसळल्यामुळे जखमाही झालेल्या होत्या, अशी माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2021 3:14 am

Web Title: relatives of the chembur landslide victims create outrage at rajawadi hospital zws 70
Next Stories
1 ..तर आणखी काही जणांचे प्राण वाचले असते!
2 अतिधोकादायक इमारतींतील रहिवाशांच्या स्थलांतराचे आव्हान
3 “मी जिवंत आहे, थोड्या वेळापूर्वी डाळ खिचडी खाल्ली”; ‘त्या’ वृत्तावर मुंबईच्या महापौरांचा खुलासा
Just Now!
X